सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबई : अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी ‘राजर्षी शाहू महाराज’ योजनेत जाचक अटी – शर्ती लागू केल्या आहेत. त्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन कल्याण डोंबिवली महानगरच्यावतीने तहसीलदार कल्याण यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या आणि सूचना खालील प्रमाणे:-
१. परदेश शिक्षण शिष्यवृत्तीच्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात जसे की, उत्पन्न मर्यादा ही वार्षिक 16 लाख रुपये पर्यंत व वयाची अट किमान 45 वर्षे पर्यंत वाढवण्यात यावी.
२. परदेशी शिष्यवृत्ती साठी येणाऱ्या विद्यार्थी अर्जाची मर्यादा 75 वरून 150 पर्यंत करावी.
३. 80% गुणांची अट रद्द करून ती कमीत कमी 60% करावी.
४. केरळ राज्य सरकारने ज्या SOP नुसार परदेश शिक्षण शिष्यवृत्तीची योजना आखली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य शासननाने योजना आखावी.
५. समाज कल्याण आयुक्त कार्यालय, पुणे व विभागीय आयुक्त यांच्या कार्यालय स्तरावरून सदर परदेश शिक्षण शिष्यवृत्तीच्या जनजागृतीसाठी शक्य होईल तशी मदत केंद्रे उभारावी.
६. विद्यापीठांचे ऑफर जोईनिंग लेटर आल्यास पात्र विद्यार्थ्यास विमान प्रवासाचे पैसे त्वरित त्याच्या खात्यावर तारखेच्या 15 दिवस अगोदरच जमा करावे.
या प्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य सोशल मिडिया प्रमुख रोहित डोळस, सम्यक विद्यार्थी आंदोलन कल्याण डोंबिवली अध्यक्ष कमलेश उबाळे, उपाध्यक्ष आम्रपाली भालेराव, महासचिव किरण म्हस्के, नितिन कांबळे आयटी प्रमुख, सचिव भाविका गवांदे, सदस्य राहुल अहिरे उपस्थितीत होते.