देशाची राज्यघटना म्हणजे संविधान याला काहीही होत नाही. होणार नाही. हा विश्वास मला कालच्या भारत जोडो न्याय यात्रा समापन सभेतून आला. तसा तो अगोदरही आला होता, केव्हा? जेव्हा लाखों शेतकरी रस्त्यावर उतरले होते. जेव्हा दिल्लीत आप’सारख्या पक्षाचे नेते आणि हजारो कार्यकर्ते आंदोलन करत होते आणि संविधान सर्वोच्च म्हणत होते आणि आम्ही त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू म्हणत होते तेव्हा. जेव्हा दिल्लीत विरोधी हजारो लोक एकवटले आणि दररोज एकवटतात,हजारो वकील त्यासाठी उभे राहतात तेव्हा,प्रत्येकवेळी मी आश्वस्त होतो,आणि म्हणून एक आंबेडकरी म्हणून मला माझी जबाबदारी आता विभागली आहे असं वाटतं,त्यामुळे माझ्या इतरही आंबेडकरी बांधवांनी आता चिल करा. आहेत सगळे आपण एकटे नाही, जबाबदारी इतरांनाही घेऊ द्यात.
काश हे चित्र पाहायला आज आमचे वडिल असते. संविधान चिरायू होवो. ही घोषणा देत त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की आता तुमची यापुढील लढाई संविधान संरक्षण करणे, बापू, विभागतील जयंती उत्सवात मार्गदर्शन करताना आम्हाला म्हणाले, यापुढे तुम्हाला आणखी एक घोषणा सोबत घ्यावी लागेल. “भारतीय संविधान चिरायू होवो” संविधान वाचविणे हीच तुमची प्राथमिकता असायला हवी. वडिल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हात पाठीवर लाभलेले. त्यांचे हे बोल. आम्हाला कायम संघर्ष करण्याची ऊर्जा देत राहतात आणि त्यासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत.
हा एक भाग असला तरी आज मला आश्वासक वाटतं की आता संविधानाला काहीही होत नाही, हा कुणा एका समाजाचा विषय राहिलेलाच नाही. भाजपाला हे सोपं वाटत असेल पण हे सोपं नाही, लोक तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत. लोक देशासाठी जीव द्यायला मागे पुढे पाहत नाहीत, त्यातला मी एक आहे. यासाठी खरंतर मी भाजपाचेच जाहीर आभार मानतो की त्यांनी देशात अशी परिस्थिती निर्माण केली की सामान्य हिंदू इतर सामान्य धर्मीय मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी, शीख, लिंगायत, भटके विमुक्त आणि अठरापगड जाती धर्म यातील घटकांना आज जाणीव झालीय की जर संविधान नसेल इथं लोकशाही नसेल तर आपली अवस्था काय होऊ शकते. आपल्या स्वातंत्र्याचं काय होऊ शकतं. हे जर देशात धोका निर्माण झाला नसता तर कधीही लक्षात आलं नसतं. त्यामुळे आता संविधान संरक्षण करण्याच्या जबाबदारीचे चळवळीची बॅटन आता पास झालीय.
मात्र काही राजकीय पक्ष ही केवळ आंबेडकरी समाजाची जबाबदारी आहे असं सतत मांडत आहेत. कारण, संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय म्हणून सर्वात अगोदर जबाबदारी तुमची.. अशी त्यांची मानसिकता आहे. म्हणजे घर चांगलं बांधलं आहे, सगळे सदस्य गुण्या गोविंदाने त्यात राहात आहेत. आता त्यावर कुणीतरी बुलडोजर फिरवायला निघालाय तर घरातील इतर सदस्य म्हणतायत. तुमच्या बापाने घर बांधलं आता तुम्हीच वाचवा. हे किती व्यवहार्य आहे? नैतिकतेला धरून आहे? आपण सगळेच या घराचे लाभार्थी मग ही एकट्याची जबाबदारी नाही ठरू शकत नाही. घरात सर्वांना राहायचं आहेच, फायदे घ्यायचे आहेत, आपलं संरक्षण करायचं आहे, अन् सुखात राहायचं देखील आहे, पण लढायला मात्र एकाच घटकाला पुढे आणायचं हे बरोबर नाही वाटत. बरं हे गेली अनेकवर्षे पुढे फ्रंटला होतेच. आता थोडं तुम्हीही या पुढे. आलं पाहिजे. सोबत मिळून लढू ना मग ताकद वाढेल.
त्यामुळे वर जरी मांडलं आहे की सर्वांना महत्व कळलं आहे. हे सगळं आश्वासक आहे, आता निश्चिंत राहता येईल आणि आपली जबाबदारी विभागली असं असलं तरी आम्ही सावध आहोतच. फक्त आता फ्रंटला इतर समाजघटक, राजकीय पक्ष इतर विचारांच्या संघटना येत आहेत आल्या आहेत. त्यांना आता नेतृत्व करायला दिले पाहिजे. थोडा संघर्ष त्यांनाही करू द्यात. आंबेडकरी चळवळीने आता ही एकमेव आपलीच जबाबदारी आहे आणि आता आपलं कसं होईल, देशाचं काय लोकशाहीचं काय या प्रश्नातून चिंतेतून नि:श्वास सोडत. स्वत:ला काहीसं आश्वस्त करावं. जबाबदारी सर्वांचीच आहे. चिल करा.