मुंबई – वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीने 8 फेब्रुवारी 2024 ला महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या तिन्ही पक्षांना 39 कलमी किमान समान कार्यक्रम (अजेंडा) पाठवला होता. या तिन्ही पक्षांनी यावर विचार करावा आणि त्यानुसार अजेंड्यामध्ये महत्वाचे मुद्दे जोडावेत, हा उद्देश यामागे होता. मात्र, अजूनपर्यंत यावर त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया अथवा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यावर या पक्षांनी लवकरात लवकर व्यक्त व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केले आहे.
पुंडकर म्हणाले की, अजेंड्याविषयी एक गोष्ट लक्षात आणून देतो, की हा 39 कलमी अजेंडा आम्ही ई-मेल केला आहे, तसेच श्री. संजय राऊत, श्री. जयंत पाटील आणि श्री. बाळासाहेब थोरात यांना वैयक्तिकरित्या पाठवला आहे. मात्र, 12 दिवस उलटूनही आम्हाला 39 कलमी अजेंड्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
आम्हाला आशा आहे, की महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लवकरच वंचित बहुजन आघाडीच्या 39 कलमी अजेंड्यावर एकमताने सहमत होतील. महाविकास आघाडी आमच्या प्रस्तावित 39 कलमी अजेंड्यावर निर्णय घेतल्यानंतर जागा वाटपाची चर्चा पुढे जाईल आणि आम्हाला लवकरच चर्चेसाठी आमंत्रित केले जाईल, अशी आशा बाळगत असल्याचेही डॉ. पुंडकरांनी म्हटले आहे.