पोटनिवडणुका न घेण्यामुळे आंबेडकरांचा निवडणूक आयोगाला ईशारा !
अमरावती : निवडणुकी आयोगापुढे तीन मार्ग आहेत. एक जबाबदारी पाळता येत नसेल तर, राजीनामा द्या आणि मोकळं व्हा. दोन, संविधानिक जबाबदारी आहे पोट निवडणूक घेणं ती पोटनिवडणूक ताबडतोब घ्या. नाहीतर जनतेला तिसरी गोष्ट करावी लागेल ती म्हणजे, ज्या ठिकाणी निवडणुक आयोग जाणार आहे त्या ठिकाणी जाऊन जनतेने निदर्शने केले पाहिजेत, मोर्चे केले पाहिजेत, निषेध केला पाहिजे आणि ते करूनही ऐकत नसतील तर, निवडणूक आयोगाला मारझोड सुद्धा केली पाहिजे. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
निवडणूक आयोगाला, मुंबई हायकोर्टने निवडणुका घ्या म्हणून आदेश दिले आहेत. ते कायद्याला धरून आदेश आहेत. असे असतानाही निवडणूका घेत नाहीत तर, आम्ही सुप्रीम कोर्टात अपील करू असे ते सांगत आहेत. निवडणुक आयोग संविधानिक चौकट मोडायला निघाले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
निवडणुक आयोगाची स्वायत्तता अबाधित राहावी म्हणून, हुकूमशहाला जे अधिकार मिळतात तेच अधिकार त्यांना दिले आहेत. कारण त्यांना निवडणूक घेण्याबाबत कोणतीही अडचण येऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. अशी तरतूद असताना निवडणूक आयोग जर पोटनिवडणूक घेणार नसेल तेव्हा लोकांनी कायदा हातात घेतला तर त्याचा अर्थ कायदा मोडला असा होत नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
निवडणुक आयोगाला त्यांनी ईशारा देताना म्हटले आहे की, आपले जे वर्तन आहे ते असंविधानिक आहे, जनतेच्या विरोधात जाणारे आहे आणि संसदीय राजकारणाच्या विरोधात आहे. त्यामुळे जनता उठाव करेल आणि त्याला तुम्हीच जबाबदार असाल.
निवडणुक आयोग स्वायत्त आहे, तो स्वायत्त असे पर्यंत निवडणुका निःपक्षपाती होतील असेही त्यांनी म्हटले.
इथले राजकीय पक्ष भूमिका घ्यायला घाबरत आहेत, निवडणूकीत जित पराजित होत असते. पण, राजकीय पक्षांनी व्यवस्थेशी इमानदार राहील पाहिजे ही किमान अपेक्षा असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.
मी वयाच्या २५ व्या वर्षीचं मंत्री झालो असतो –
रामदास आठवलेंच्या प्रतक्रियेवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, मला मंत्री व्हायचं असतं तर मी 25 व्या वर्षीच मंत्री झालो असतो. मंत्री माझ्या पाठीमागे पळत असतात, मुंख्यमंत्री सुद्धा माझ्या मागे पळत असतात. मी पदाच्या पाठीमागे पळत नाही.