औरंगाबादच्या दै. मराठवाडाच्या पुरवणीत पहिल्याच पानावर बाळासाहेब यांची प्रदीर्घ मुलाखत माझे मनोगत या नावाने छापली आहे. हे मनोगत देताना चौकटीत म्हटले होते, रिपाईंच्या वेगवेगळ्या गटांचे ऐक्य. त्यानंतर तयार झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षातील अंतर्गत घडामोडी, वादविवाद या पार्श्वभूमीवर खासदार श्री. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे अधिवेशन नांदेड येथे भरत असून, त्यानिमित्ताने बाळासाहेबांनी व्यक्त केलेले मनोगत येथे विस्ताराने प्रसिध्द करीत आहोत.
माझे मनोगत,
खासदार, एड. बाळासाहेब आंबेडकर
आंबेडकरी विचारांची ध्येय धोरणे घेऊन जाणारी एखादी राजकीय संघटना-पक्ष कोणता असा प्रश्न विचारला, तर लोकांच्या समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे नाव येते. हा पक्ष स्थापनेपासून वादाच्या भोव-यात सापडला आहे. कधी मार्क्सवादी कधी मार्क्सवाद विरोधात, तर कधी कोणाशी समझोता करावा या वादात अडकला. तर कधी तो नेतृत्वाच्या वादात अडकला. पहिल्या दोन कारणांतून तो तावून सुलाखून निघाला आणि या कालावधीत दोन पिढ्या संपल्या.
नेतृत्वाचा हा वाद सद्य:परिस्थितीतही कायम आहे. या वादातून तो बाहेर कसा काढायचा हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. सध्याची अवस्था पाहाता सगळेजण निराश होत आहेत. त्याचबरोबर तरुणांचे आकर्षण इतर पक्षांकडे वळत आहे आणि त्याला काही बिनबुडाचे नेते उदा. नामदेव ढसाळसारखे भरीस घालत आहेत.
हे मी मान्य करीत नाही की, रिपब्लिकन चळवळ ही दिशाहीन होत आहे. नेतृत्वाचा वाद जरी राहिला, तरी आंबेडकरी चळवळ स्वातंत्र्याच्या ५० वर्षांनंतरही दिशा देऊ शकेल.
ऐक्याच्या सुरुवातीपासून ऐक्याला विधायक वळण लागावे म्हणून मी प्रयत्नशील होतो. ज्यावेळेस पक्षाचे अध्यक्ष आणि इतर पदाधिका-यांच्या नेमणुकीसंदर्भात सुरुवातीलाच एकमत होत नव्हते. त्यावेळी अध्यक्षीय मंडळ स्थापन करून पक्ष चालवावा आणि त्याप्रमाणे तो चालविला गेला. अध्यक्षीय मंडळाच्या नेमणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाच्या नावाने असणारे सगळे पक्ष विसर्जित झाले पाहिजेत या दृष्टीने कार्यवाही होत नव्हती. त्यावेळेस पुण्याच्या एड. जयदेव गायकवाड यांना पक्ष विसर्जनाचा नमुना (फॉर्मॅट) तयार करायला सांगितला. तो सगळ्यांना देण्यात आला. विसर्जनाचा नमुना खालील प्रमाणे होता.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोडून इतर सर्व पक्ष विसर्जित करत आहोत. असे ठराव प्रत्येकाने आपापल्या कार्यकारिणीत मंजूर करावेत आणि ते निवडणूक आयोगाकडे पाठवावेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( गवई गट) यांनी त्यांची कार्यकारिणी विसर्जित केली आणि आर. एस. गवई हे अध्यक्ष नाहीत ,असा ठराव मंजूर करण्याचा आराखडा एड. जयदेव गायकवाड यांनी त्यांना दिला व त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाच्या नावाने चालणा-या संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात विलीन होत आहेत आणि यापुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कामकाज अध्यक्षीय मंडळ पाहील, असे मंजूर करण्यात आले. या सर्व ठरावांसोबत नवीन रिपब्लिकन पक्षाची घटना निवडणूक आयोगास २८ मार्च १९९६ रोजी सादर करण्यात आली. ती त्यांनी मंजूर केली.
दरम्यानच्या काळात लोकसभेच्या निवडणुका भारिप बहुजन महासंघाला मागील निवडणुकीत जी भरघोस मते मिळाली; त्यातील रिपब्लिकन मते ऐक्यामुळे आपल्याला मिळतील व बहुजन महासंघास बरोबर घेतल्यास बहुजनांची मतेही मिळतील आणि आपण विजयी होऊ या हेतूने बहुजन महासंघाशी समझोता आणि नैसर्गिक मित्रत्वाची घोषणा झाली. त्याच कालावधीत कॉंग्रेसविरोधी मानसिकता आणि कॉंग्रेसबरोबर समझोता केला , तरी आपल्या सर्वांना त्या जागा (सीट्स) सुटत नाहीत या वास्तवतेचं भान ठेवून विरोधी पक्षांबरोबर समझोता झाला. लोकसभेच्या निवडणुका जिंकता आल्या नाहीत; परंतु राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली.
निवडणुकीच्या पराभवानंतर पक्षाची जी बैठक झाली; त्यामध्ये ज्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उघड उघड कामकाज केले होते; त्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे आग्रह धरला. परंतु, अध्यक्षीय मंडळाच्या अनेक सदस्यांनी त्याकडे कानाडोळा करून दुर्लक्ष केले. कारवाई न झाल्याने अनेक जणांना हिंमत आणि उघड उघड बंडखोरी करण्याचे स्फुरण चढले. काहीही केले तरी कारवाई होत नाही ,अशी भावना झाली. त्याचा परिणाम त्यानंतर झालेल्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दिसून आला.
मे ९६ मध्ये अध्यक्षीय मंडळाच्या झालेल्या बैठकीत बंडखोरांवर कारवाई करावी; त्याचबरोबर वेळ असल्यामुळे पदाधिका-यांच्या नेमणुका या निवडणुकांच्या मार्गाने कराव्यात याबाबत आग्रह धरला आणि घटनेच्या नियमाप्रमाणे सदस्य नोंदणी झाली पाहिजे व त्याच सदस्यांनी आपले पदाधिकारी नेमले / निवडले पाहिजे ,असा मी आग्रह धरला. त्या अनुषंगाने सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आखण्यात आला. त्यात असे ठरले की, ज्याला ज्याला पक्षाचा क्रियाशील सभासद व्हायचे आहे; त्याने किमान पंचवीस प्राथमिक सदस्य केले पाहिजेत. प्राथमिक सदस्य आणि क्रियाशील सदस्यत्वाची फी अनुक्रमे रु. ५/- व २५/- अशी ठरविण्यात आली. छपाई आणि वितरणाची जबाबदारी राजा ढाले यांच्यावर सोपविण्यात आली. सभासद नोंदणी करण्यासाठी जिल्हावार विभागणी अध्यक्षीय मंडळाच्या सदस्यांमध्ये करण्यात आली. नोंदणी करण्याची पध्दती ठरली की, ज्याच्याकडे जो जिल्हा दिला आहे; तो त्या जिल्ह्यामध्ये एक किंवा दोन दिवस थांबेल. त्यांच्या येण्याची माहिती जिल्हाभर दिली जाईल. ज्यांना क्रियाशील सभासद व्हायचे आहे; त्यांची नांवे नोंदविली जातील व त्यांनाच प्राथमिक सदस्यत्वाचे (२५ सदस्य) नोंदणी पुस्तक दिले जाईल व नंतर एक महिन्याने पुन्हा एकदा क्रियाशील सदस्यांची बैठक बोलाविली जाईल व ज्यांनी ज्यांनी २५ प्राथमिक सदस्य नोंदविले. त्यांना पक्षाचा क्रियाशील सदस्य म्हणून मान्यता दिली जाईल. या मार्गाने ऑगस्ट ९६ अखेर क्रियाशील सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली की, ऑक्टोबर ९६ मध्ये पक्षाचे अधिवेशन घेऊन क्रियाशील सदस्यांमार्फत पक्षाचे अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी व इतर पदाधिकारी निवडण्यात येतील. या कार्यक्रमास अध्यक्षीय मंडळाची मान्यता होती. अध्यक्षीय मंडळातील ज्या सदस्यांना क्रियाशील सभासद करण्यात स्वारस्य होते; त्यांनी आपली मोहीम सुरू केली. परंतु, ज्यांना क्रियाशील सभासद नोंदणीत स्वारस्य नव्हते; त्यांनी पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत घोळ घातला. यामध्ये गवईंनी पुढाकार घेतला. त्यांच्या मते, ही पध्दत घटनाबाह्य आहे आणि रु. २५/- ही रक्कम अधिक असून ती रु. १०/-करावी. तसेच राजा ढाले यांच्याकडून सर्व जबाबदारी काढून घेऊन ती रामदास आठवले यांच्याकडे सोपवावी. ही चालढकल पध्दत त्यावेळेस लक्षात आली होती. परंतु, ऐक्याला विधायक वळण द्यायचे असल्यास हे ऐक्य केवळ नेत्यांपुरतेच मर्यादित न राहता त्यात तळागाळातील कार्यकर्त्यांची इन्व्हॉलमेंट झाली तर ते टिकू शकेल. त्या दृष्टीने ऑक्टोबर ९६ मध्ये पक्षाच्या अधिवेशनासाठी मान्यता दिल्याने या सगळ्या बदलाचा विचार करण्यात आला. ऑगस्ट ९६ नंतर या सभासद नोंदणी पुस्तकांचे काय झाले; याचा हिशेब आणि पैसे अद्यापही जमा झालेला नाही. पक्षाच्या बैठका होत राहिल्या; परंतु त्यांत कार्यक्रम तथा पक्षबांधणीवर चर्चा झाली नाही. या बैठकीत आपला सत्तेमध्ये सहभाग नाही याचेच दु:ख व्यक्त केले गेले व या कारणास्तव जिल्हा-जिल्ह्यातील सभासद नोंदणीचे कार्यक्रम थांबविण्यात आले. मी अध्यक्षपदाचा उमेदवार असे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. मी अध्यक्षपद घेईन; ही भीती वाटायला लागली. त्यावेळी ६ डिसेंबर ९६ च्या अभिवादन सभेत मी पक्षाच्या कोणत्याही पदासाठी उभा राहाणार नाही, असे जाहीर केले. त्यामागे हेतू हा होता की, इतरजण निश्चित होऊन कामाला लागतील. परंतु ,माझ्या या जाहीर आश्वासनानंतर काहीच हालचाल होत नसल्याचे दिसताच, अध्यक्षीय मंडळातील काही सदस्यांना पक्षांतर्गत निवडणुका टाळायच्या होत्या आणि तेथूनच अध्यक्षीय मंडळाच्या बैठकींना मी जाणे थांबविले.
समोर महानगर पालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका येऊन ठेपल्या होत्या. मागच्या विधानसभा निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघास विजयाच्या रूपाने यश जरी नसेल आले, तरीही एक राजकीय दहशत निर्माण झाली होती. ऐक्यानंतर या राजकीय दहशतीचे वलय कमी झाले. हे वेगळे की, कदाचित एखाद संधी आंबेडकरी चळवळीतील लोकांनी भारिप-बहुजन महासंघास दिली असती; तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते. आंबेडकरी चळवळीबरोबर बहुजनांतील समूह जमवायला सुरुवात झाली होती आणि रिपब्लिकन पक्षाच्या एकजातीय राजकारणाचा चेहरा पूर्णपणे बदलत होता. ऐक्यासाठी हे बलिदान द्यावे लागेल याबद्दल आज खंत नाही. परंतु, ऐक्याला विधायक वळण देण्याचा ठाम निश्चय केला होता. मला माझ्या राजकीय वलयाची जाणीव आहे. तिचा आजपर्यंत मी कधीही सौदा होऊ दिलेला नाही. मात्र, ऐक्यातील काही मंडळी तिचा सौदा करण्यासाठी टपली आहेत; याची मला जाणीव आहे. त्यामुळे बैठकीला न जाता निवडणुकांच्या तारखा निश्चित करा व त्या झाल्याशिवाय मी बैठकांना येणार नाही या माझ्या भूमिकेशी ठाम राहिलो. या दरम्यान ज्यांच्याशी ही राजकीय बोलणी करावयास गेले त्या सगळ्यांनी या सर्वांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, आमच्या तुमच्याबरोबर राजकीय युत्या अगोदर झाल्या आहेत व त्याचे परिणामही आम्ही पाहिले आहेत. अध्यक्षीय मंडळात ऐक्य असेल, तरच आमच्याशी बोला. नाही तर नाही. सदर स्थितीची जाणीव झाल्यानंतर माझ्या अनुपस्थितीत मला निवडणूक अधिकारी नेमले आणि निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या. निवडणुका घ्या हा माझा आग्रह होता. कारण आम्ही कोणाला तरी प्रमुख मानायला शिकलं पाहिजे आणि त्यातून कार्यकर्त्यांना जो हवा असतो तो अध्यक्ष होऊ शकतो.
(क्रमशः)
(संदर्भ : माझे मनोगत-बाळासाहेब आंबेडकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय अधिवेशन दै. मराठवाडा विशेषांक, नांदेड : दिनांक, २९ ऑक्टोबर ९८, पाने ४, स्वागत मूल्य २ रु., पान – १)
दुसरा भाग वाचण्यासाठी खाली दिलेली लिंक क्लिक करा.