अकोला : अकोट तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत पुढील महिन्यात दिवाळी व सणासुदीचे दिवस असताना विद्युत महावितरण कंपनीकडून वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचे कृषी पंप तसेच घरगुती वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत अमानवीय असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अकोट तालुका अध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वाखाली दि. ४ नोव्हेंबर रोजी कार्यकारी अभियंता, विद्युत महावितरण कंपनी, विभागीय कार्यालय, अकोट यांना तातडीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनातून दुष्काळ संपेपर्यंत शेतकऱ्यांचे कृषी पंप आणि गरीब कुटुंबांचे घरगुती वीज कनेक्शन खंडित करू नयेत, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, शेतातील कृषी पंपाचे वीज कनेक्शन कापल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दुष्काळ संपेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन महावितरणने कापू नये.
तसेच गरीब कुटुंबांकडे घरगुती वीजबिल भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. सणासुदीच्या तोंडावर घरातील वीज कनेक्शन कापल्यास नागरिकांनी अंधारात सण कसे साजरे करायचे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही गरीब कुटुंबाचे घरगुती वीज कनेक्शन खंडित करू नये, अशी मागणीही करण्यात आली.
विशेष म्हणजे, महावितरणने बसवलेल्या स्मार्ट मीटरमध्ये वीजबिल न भरल्यास स्वयंचलित पद्धतीने वीजपुरवठा खंडित होण्याची प्रणाली आहे. ही प्रणाली गरीब शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी घातक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय दिवाळीसारख्या सणाच्या काळात घरातील वीजपुरवठा बंद होणे अन्यायकारक आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात तसेच दुष्काळ संपेपर्यंत स्मार्ट मीटरद्वारे होणारी स्वयंचलित वीज खंडित करण्याची प्रक्रिया तात्काळ बंद करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण इंगळे, महासचिव रोशन पुंडकर, प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सरकटे, काशीराम साबळे, मंगेश चिखले, संदेश घनबहादुर, रमेश सरकटे, संभा थोरात, निखिल गावडे, संजय पुंडकर, संजय बुध, मंदा कोल्हे, सुनिता हिरोळे, लता कांबळे, सुनिता वानखडे, स्वाती चिखले, डॉ. अनिल गणगणे, अमन गवई, आशिष रायभोल, प्रेमराज भटकर, पंजाबराव पाचपाटील, स्वप्निल घनबहादुर, मयूर सपकाळ, डॉ. श्याम नेमाडे, राजेश वानखडे, मंगेश कांबळे, अतुल अढाऊ, गोपाल ढोरे, दादु निताळे, नरेश खरात, लखन इंगळे, इम्रान पठाण, सुनिल घनबहादुर, स्वप्निल दहिभात, रजित सरकटे, संदीप आग्रे, धिरज सिरसाट, सुभाष तेलगोटे, सदानंद तेलगोटे, दिपक तेलगोटे, विकी धांडे आणि गजानन दौड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.




