अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात हजारो झाडांची बेकायदेशीर व भीषण कत्तल करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी वन अधिकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना सेवेतून निलंबित करावे, या प्रमुख मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी महोदय तसेच जिल्हा वनसंरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल यांना देण्यात आले.
सध्या संपूर्ण राज्यासह अहमदनगर जिल्हा भीषण दुष्काळ, वाढते तापमान आणि पाण्याचा गंभीर तुटवडा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आहे. अशा अतिशय नाजूक परिस्थितीत निसर्गाचे रक्षण करणाऱ्या हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल होणे आणि प्रशासकीय यंत्रणांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे ही अतिशय संशयास्पद व निषेधार्ह बाब आहे.
शेवगाव परिसराची दप्तर व प्रत्यक्ष पाहणी, देखरेख आणि संरक्षणाची प्राथमिक जबाबदारी असतानाही कर्तव्यात गंभीर कसूर करणाऱ्या वनक्षेत्र अधिकारी मिलिंद गोवेकर (पाथर्डी), वनपाल संदीपकुमार एकशिंगे (शेवगाव), फिरत्या पथकाचे वनपाल सचिन शिंदे, वनरक्षक बालकृष्णा बडे (शेवगाव), फिरत्या पथकाचे वनरक्षक अर्जुन खेडकर, वनरक्षक सागर साळवे आणि वनरक्षक विजय पावले या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शेवगाव येथील अनेक वखारींमध्ये (सॉ मिल) हजारो झाडांची कत्तल करून वनरक्षक व वनपाल यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर लाकडांचा अवैध साठा करण्यात आला आहे.
घटना उघडकीस येऊन १० दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही या दोषींवर वनविभागाकडून कोणतीही ठोस प्रशासकीय वा कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. स्थानिक वन कर्मचाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर लाकडांची कत्तल, वाहतूक आणि साठवणूक होणे अशक्य आहे. शेवगावमधील या भीषण महाघोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील अतिशय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर अभयारण्य परिसरातही अशाच प्रकारे वृक्षतोड होत असल्याच्या बातम्या समोर येत असून, यावर प्रशासनाने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पर्यावरणाचा विनाश करून नागरिकांच्या भविष्यातील जीविताला धोक्यात आणल्याप्रकरणी शेवगाव तालुक्यातील संबंधित सर्व दोषी वन अधिकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात यावे, तसेच यामागील लाकूड माफिया, सॉमिल मालक आणि मुख्य सूत्रधारांचा पर्दाफाश करावा, असे निवेदनात स्पष्ट म्हटले आहे. जर प्रशासनाने या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी प्रसाद भिवसने, अविनाश धनवे, सुशील साळवे, सुरेश पानपाटील आणि आदित्य काळे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.






