ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी फोनद्वारे साधला संवाद; कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन
अकोला: बाळापूर तालुक्यातील निंबा येथील गोपाल हरिचंद्र राठोड या शेतकऱ्याचे कर्जवसुलीच्या कारणावरून फायनान्स कंपनीने घर सील केल्याने राठोड कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राठोड कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. तसेच दिवाळी साजरी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आर्थिक सहाय्य देण्यात आले.
गोपाल राठोड यांनी महिंद्रा फायनान्स कंपनीकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ४४ हजार रुपयांचा भरणाही केला होता. मात्र, राठोड हे शारीरिकदृष्ट्या अपंग असून त्यांच्या शेतीतील पिके दुष्काळामुळे करपून गेली आहेत. त्यातच कुटुंबातील वडील आणि मुलाचे निधन झाल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही फायनान्स कंपनीकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यात आल्याचा आरोप आहे. अखेर कंपनीने राठोड यांच्या घराला सील केल्याने संपूर्ण कुटुंब बेघर होऊन उघड्यावर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी तातडीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह निंबा येथे जाऊन गोपाल राठोड यांची भेट घेतली. यावेळी गटनेते गजानन गवई, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय बावने, माजी जिल्हा सचिव प्रदीप ऊर्फ बबलुभाऊ सिरसाट, महिला तालुका उपाध्यक्ष इंदुबाई वानखडे, माजी तालुका महासचिव सुभाषराव तायडे, राजू मोरे, सहदेव भटकर, शांतशील तायडे, दीपक घ्यारे, शहजाद भाई, बाबाराव बागडे, नामदेव मास्कर, सय्यद अमीर, कैलास तायडे, श्रीकृष्ण डाबेराव, दीपक मास्कर, सय्यद नासीर, संतोष मास्कर, गणेश बोरसे, देवानंद तायडे, माजी सरपंच नागेश तायडे आदी उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गोपाल राठोड यांचा फोनद्वारे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी संवाद देखील करून दिला. राठोड कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आपण आणि संपूर्ण वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, तसेच सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते तथा माजी जिल्हा सचिव बबलुभाऊ सिरसाट यांनी राठोड कुटुंबाला दिवाळी साजरी करता यावी यासाठी तातडीने भरीव आर्थिक मदत दिली.
या प्रकरणात शासनाने तातडीने हस्तक्षेप करून राठोड कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, तसेच फायनान्स कंपनीच्या कथित बेकायदेशीर कारवाईची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.






