पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी पुणे शहरात काढलेल्या आक्रोश मोर्चाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला. ओंकारेश्वर मंदिरापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे स्टेशन परिसरातील पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रदादा पातोडे यांच्या सूचनेनुसार पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी मोर्चाला उपस्थित राहून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची दडपशाही सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांच्या केसालाही पोलिसांनी हात लावला, तर त्याची गाठ ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्याशी असेल, अशी भूमिका ॲड. तायडे यांनी मांडली. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणी त्यांनी केली.
बीएनएसएसच्या कलम १६८ अंतर्गत नोटिसा द्यायच्या असतील, तर त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना द्याव्यात; मात्र आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटिसा देऊ नयेत, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मांडण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर आणि ठाम पाठिंबा देण्यात आला. आंदोलनस्थळी युवक अध्यक्ष सागर आल्हाट, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे किरण सैंदाणे, संघर्षा संकद पर्वती अध्यक्ष ॲड. रवींद्र गायकवाड, पुणे शहर उपाध्यक्ष परमेश्वर सणादे, निरंजनाताई सोनवणे, सविताताई चाबुकस्वार, अरविंद कांबळे, अमोल भडकवाड यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
एमपीएससीच्या परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि आयोगाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.






