झाडे-झुडपे वाढण्यास सुरुवात; सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर — नूतनीकरणानंतर देखभाल-दुरुस्ती कुठे हरवली?
अकोला : तब्बल एक कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ सभागृहाची पुन्हा दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. सभागृहाच्या परिसरात झाडे-झुडपे तसेच गाजर गवत मोठ्या प्रमाणात वाढू लागले असून, स्वच्छता व देखभालीचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. लाखो-कोट्यवधींचा निधी खर्च करून वास्तूचे नूतनीकरण करायचे आणि त्यानंतर तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष करायचे, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा गटनेते निलेश देव यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या सभागृहाच्या दुरवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी सातत्याने आवाज उठविला होता. प्रा. अंजली आंबेडकर तथा युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दोन वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊ जयंतीच्या दिवशी हातात झाडू घेऊन स्वच्छतेची सुरुवात केली होती. त्यानंतर २०२४ मध्ये शिवजयंतीच्या दिवशी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. पाठपुराव्यानंतर सभागृहाला नवसंजीवनी मिळाली.
मात्र, नूतनीकरणाला काही काळ लोटत नाही तोच पुन्हा झाडे-झुडपे, गाजर गवत आणि अस्वच्छतेने सभागृहाच्या परिसरात डोके वर काढले आहे. त्यामुळे शासनाच्या निधीतून केलेल्या नूतनीकरणाची देखभाल कोण करणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
२८ ऑक्टोबरचे पत्रही दुर्लक्षित!
राजमाता जिजाऊ सभागृहाच्या भवितव्याबाबत २८ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना सविस्तर पत्र देण्यात आले होते. सभागृहाचे रूपांतर ‘राजमाता जिजाऊ संग्रहालय व वास्तुशिल्प संग्रहालय’ म्हणून करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र, या मागणीची अपेक्षित दखल घेण्यात आली नसल्याचे निलेश देव यांनी म्हटले आहे.
सभागृहाच्या शेजारी नवीन जिल्हा न्यायालयाची इमारत उभी राहत असल्याने मोठ्या आवाजातील कार्यक्रमांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अकोला शहरात संविधान सभागृह, जिल्हा नियोजन भवन यांसह विविध प्रशासकीय सभागृहे उपलब्ध आहेत. त्यामुळे अभियंता प्रशिक्षण केंद्र अन्यत्र हलवून जिजाऊ सभागृहाचे कायमस्वरूपी संग्रहालयात रूपांतर करावे, अशी मागणी देव यांनी केली आहे.
‘दुरुस्ती करा, अन्यथा सभागृह ताब्यात घेऊ!’
“एक कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या राजमाता जिजाऊ सभागृहाची अवस्था पुन्हा खराब होऊ देणार नाही. परिसरात झाडे-झुडपे व गाजर गवत वाढत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याची दखल घ्यायला वेळ नाही, हे दुर्दैवी आहे. विभागाने तातडीने पाहणी करून स्वच्छता, देखभाल व आवश्यक दुरुस्तीची कामे करावीत. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ सभागृह ताब्यात घेऊन तेथे ‘आई जिजाऊ’च्या नावाने कायमस्वरूपी ज्योत प्रज्वलित करण्यात येईल आणि सभागृहाची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पुढाकार घेईल,” असा इशारा नगरसेवक तथा गटनेते निलेश देव यांनी दिला आहे.
‘जिजाऊंच्या नावाची वास्तू केवळ इमारत नको, प्रेरणास्थळ हवे!’
राजमाता जिजाऊंच्या नावाने असलेली ही वास्तू केवळ चार भिंतींचे सभागृह न राहता इतिहास, संस्कार, स्त्रीशक्ती आणि स्वराज्याच्या विचारांचे कायमस्वरूपी प्रेरणास्थळ बनले पाहिजे. एका बाजूला कोट्यवधींचा निधी खर्च करून नूतनीकरण करायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याच वास्तूच्या परिसरात गाजर गवत व झाडे-झुडपे वाढू द्यायची, हा शासनाच्या पैशांचा आणि ऐतिहासिक वास्तूचा अपमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार का? की एक कोटींच्या नूतनीकरणानंतर ‘जिजाऊ सभागृह’ पुन्हा दुर्लक्ष, अस्वच्छता आणि गाजर गवताच्या विळख्यातच राहणार? हा सवाल अकोलेकरांकडून उपस्थित केला जात आहे.






