पुणे: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण आणि इस्रायलमधील तणावपूर्ण संघर्षाचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे. गेल्या शनिवारी इराणमधील मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली. या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचा परिणाम भारतातील एलपीजी उपलब्धतेवर होत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. देशभरात उपलब्ध असलेल्या प्रोपेन आणि ब्यूटेन या घटकांचा वापर प्रामुख्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी करण्यास प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गॅसच्या उपलब्धतेत तात्पुरता तुटवडा जाणवत असल्याने पुढील आदेश येईपर्यंत काही सेवा मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. (Iran israel war)
या निर्णयाचा परिणाम पुण्यातील स्मशानभूमींवरही झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या माहितीनुसार, वैकुंठ स्मशानभूमी येथे कार्यरत असलेल्या तीन गॅस आधारित दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तेथील पाच विद्युत दाहिन्या आणि एपीसी (Air Pollution Control) प्रणालीवर आधारित दाहिन्या सुरू ठेवण्यात येतील.
दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पेट्रोल आणि डिझेलचा आपत्कालीन साठा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Iran israel war)
जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी बीपीसीएल, आयओसीएल आणि एचपीसीएल या इंधन पुरवठा कंपन्यांच्या रिटेल सेल्स अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत शासकीय वाहनांना इंधनाचा तुटवडा भासू नये, यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर आवश्यक प्रमाणात पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Iran israel war)
तसेच, कोणत्याही पेट्रोल पंप चालकाने साठेबाजी करू नये किंवा वाढीव दराने इंधन विक्री करू नये, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.






