पुणे : पुस्तकांच्या दुनियेत ‘मनोविकास’ प्रकाशन संस्था उभी करणारे ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अरविंद पाटकर यांचे पहाटे ३ वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुपारी २.३० वाजता पुण्याच्या नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानाभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली असून, समाजमाध्यमांवर अनेक मान्यवरांनी दिलगिरी व्यक्त केली.
अरविंद पाटकर यांचा प्रवास हा संघर्षातून यशाकडे गेलेला प्रवास होता. त्यांनी सार्वजनिक आयुष्याची सुरुवात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून केली. गिरणी कामगार युनियनच्या माध्यमातून त्यांनी शोषितांचे प्रश्न मांडले. मात्र, दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक संपाच्या काळात पक्षांतर्गत मतभेद झाले आणि त्यांनी एका वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला. (arvind patkar)
पक्षातून बाहेर पडल्यावर जगण्याचा प्रश्न समोर असताना अभिनव प्रकाशनचे वा. वि. भट यांचे मोलाची मदत मिळाली. पक्षाच्या सभा आणि आंदोलनांमध्ये पुस्तक विक्रीचा अनुभव पाटकरांना आधीपासूनच होता. याच अनुभवाच्या बळावर त्यांनी ‘विकास बुक सेंटर’ या नावाने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला माटुंगा येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर, त्यानंतर नायर, केईएम, जेजे, सायन अशा मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये त्यांनी पुस्तक विक्री केली.
मुंबई महानगरपालिकेचा जिमखाना, ओल्ड कस्टम हाउस, रिझर्व्ह बँकेची इमारत अशा विविध ठिकाणी त्यांनी पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन केले.
४ एप्रिल १९८४ रोजी आमदार निवासात पहिले अधिकृत दुकान सुरू झाले. कुडाळमधील प्रदर्शनादरम्यान एका हितचिंतकाने दिलेल्या सूचनेवरून ‘विकास’चे रूपांतर ‘मनोविकास’ मध्ये झाले आणि एका नव्या ब्रँडचा जन्म झाला. (arvind patkar)
१९८५ मध्ये ‘शाहीर’ या पहिल्या पुस्तकाने सुरू झालेला मनोविकासचा प्रवास पुढे थक्क करणारा ठरला. वैचारिक, सामाजिक आणि साहित्यातील कसदार पुस्तके प्रकाशित करून त्यांनी मराठी प्रकाशन विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. २००५ मध्ये ते पुण्यात स्थायिक झाले आणि तिथूनच त्यांनी मनोविकासचा विस्तार अधिक व्यापक केला. मात्र, त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. केवळ पुस्तक छापणे नव्हे, तर वाचकांपर्यंत विचार पोहोचवणे हाच त्यांचा ध्यास होता.” अशा शब्दांत साहित्य वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.






