ओडिया चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अभिजीत मजुमदार यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मागील अनेक महिन्यांपासून ते मृत्यूशी झुंजत होते. आज (रविवार) यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनानंतर ओडिया सिनेसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. एका प्रतिभावान संगीतकाराच्या जाण्याने ओडिया संगीतातील एक सुरेल अध्याय आज कायमचा बंद झाला आहे. अभिजीत यांच्या पश्चात त्यांची पत्नी रंजिता मजुमदार आणि मुलगा असा परिवार आहे.
अभिजीत मजुमदार हे गेल्या काही काळापासून गंभीर आजारांशी लढा देत होते. सप्टेंबर २०२५ पासून त्यांच्यावर भुवनेश्वर येथील एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी क्रॉनिक लिव्हर डिसीज, उच्च रक्तदाब, हायपोथायरॉईडीझम आणि इतर अनेक आरोग्य समस्यांशी त्यांनी झुंज दिली.
शनिवारी रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले होते, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
७०० गाण्यांचा अनमोल वारसा
अभिजीत मजुमदार यांनी केवळ चित्रपटच नव्हे, तर ओडिया संस्कृतीच्या घराघरात आपले संगीत पोहोचवले. २००० च्या दशकात त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आणि अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले. त्यांनी ओडिया आणि संबलपुरी अशा दोन्ही भाषांमधील ७०० हून अधिक गाण्यांना संगीत दिले. तसेच त्यांचे संगीत ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील रसिकांच्या पसंतीस उतरले होते.





