संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया
हिंगोली : “संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते” या प्रेरणादायी भावनेतून यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शिरड शहापूर यांच्या वतीने शिरड शहापूर व परिसरातील शाळांमध्ये भारतीय संविधान या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
ही स्पर्धा शिरड शहापूर जिल्हा परिषद प्रशाला माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा, श्री शांती विद्यामंदिर माध्यमिक शाळा, काठोडा तांडा, शेंदूरसना व शिरला येथील जिल्हा परिषद शाळा येथे उत्साहात पार पडली. संविधानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, लोकशाही मूल्यांची ओळख व्हावी आणि नागरिकत्वाची जाणीव वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती.

संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हिंगोली अनिल कांबळे यांनी प्रत्येक शाळेस भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून एकूण ११०० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रत्येक शाळेत करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अनिल कांबळे यांनी दिली.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवण करणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. संस्थेचे स्वयंसेवक
आनंद ढेंबरे, शामसुंदर ठोंबरे, विकी सूर्यतळ, यश राठोड, दीपक सूर्यतळ, गजानन बिचेवार, चक्रवर्ती जगताप, राजू मुकाडे, यशवंत कांबळे, लक्ष्मण मोगल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.





