औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने शहरात प्रचाराची राळ उठवली आहे. प्रभाग क्रमांक २८ मधील महू नगर आणि राहुल नगर परिसरात युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन ‘वंचित’च्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

प्रभाग २८ च्या अधिकृत उमेदवार लता निकाळजे, अय्युबखान जब्बार खान पठाण, वर्षा काळे आणि पंकज बनसोडे यांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांनी महू नगर आणि राहुल नगरच्या गल्लीबोळांत पदयात्रा काढली.
यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांशी थेट संवाद साधला. “स्थानिक प्रश्नांची जाण असलेले आणि सामान्यांच्या हक्कासाठी लढणारे उमेदवार महापालिकेत पाठवणे काळाची गरज आहे,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

‘वंचित’च्या पॅनेलला विजयी करण्याचा निर्धार
सुजात आंबेडकर यांनी चारही उमेदवारांच्या कार्याचा गौरव करत त्यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
“महू नगर आणि राहुल नगरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे पॅनेल सक्षम आहे. सर्वसमावेशक विकासाचे मॉडेल उभे करण्यासाठी या चारही उमेदवारांना आपले मत द्या,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

नागरिकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद
पदयात्रेदरम्यान सुजात आंबेडकरांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. “वंचित बहुजन आघाडीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सुजात आंबेडकरांच्या या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.






