मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वॉर्ड क्रमांक १३९ मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल सोहनी यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा संपन्न झाली.
या सभेत बोलताना त्यांनी मुंबईच्या मूलभूत प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आणि मुंबईकरांना परिवर्तनासाठी ‘वंचित’ला साथ देण्याचे आवाहन केले.

जाहीर सभेत संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मुंबईतील सद्यस्थितीवर बोट ठेवले. त्या म्हणाल्या की, “देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आजही सर्वसामान्य नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.
आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे, शिक्षणाचा दर्जा खालावला आहे आणि रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. मुंबईकरांना हक्काचे शिक्षण, दर्जेदार आरोग्य सेवा आणि सुरक्षित रस्ते देण्याचे आश्वासन केवळ वंचित बहुजन आघाडीच पूर्ण करू शकते.”

स्नेहल सोहनी यांच्या विजयाचा निर्धार
वॉर्ड १३९ च्या उमेदवार स्नेहल सोहनी यांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांनी या भागाच्या विकासासाठी स्नेहल सोहनी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. “युतीच्या माध्यमातून आम्ही मुंबईला एक स्वच्छ, सुरक्षित आणि रोजगारक्षम शहर बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रभाग १७ मध्ये ‘वंचित’ची भव्य रॅली; जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी आपल्या भाषणात मुंबईच्या सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा मुद्दाही प्रभावीपणे मांडला. मुंबईतील वाढत्या बेरोजगारीवर चिंता व्यक्त करत, वंचित बहुजन आघाडीच्या सत्तेत स्थानिकांच्या रोजगाराला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या जाहीर सभेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






