मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तीन वर्षांच्या एलएलबी (LLB 3 Years) अभ्यासक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
मात्र, या नोंदणी अर्जामध्ये पदवीच्या पर्यायांमध्ये ‘BSc’ (विज्ञान शाखा) हा पर्यायच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. या गंभीर तांत्रिक चुकीबद्दल वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र प्रदेश कडून तीव्र संताप व्यक्त करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तांत्रिक त्रुटीमुळे विज्ञान शाखेचे विद्यार्थी वंचित
३ वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील (BA, BCom, BSc, BTech इ.) पदवीधर विद्यार्थी पात्र असतात. ८ जानेवारी २०२६ पासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अर्जातील ड्रॉपडाउन मेनूमध्ये इतर शाखांचे पर्याय दिसत असताना ‘BSc’ हा महत्त्वाचा पर्याय गहाळ आहे.यामुळे हजारो विज्ञान शाखेचे विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत.
औरंगाबादमध्ये अंजलीताई आंबेडकरांच्या सभेला संतोषी माता नगरात उदंड प्रतिसाद; ‘प्रबुद्ध भारत’ या वृत्तपत्रासाठी देणगी देण्यात आली
हेल्पलाईन क्रमांक असून नसल्यासारखेच
या तांत्रिक समस्येबाबत (Technical Glitch) विद्यार्थ्यांनी आणि युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर दिवसभर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र, दिलेल्या तिन्ही क्रमांकांवर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढला आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचा इशारा
सीईटी सेलच्या कारभारावर ताशेरे ओढताना वंचित बहुजन युवा आघाडीने म्हटले आहे की, “सीईटी सेल दरवर्षी परीक्षांचे आयोजन करते, परंतु दरवर्षी नवनवीन तांत्रिक समस्या उद्भवतात. मागील चुकांमधून सेल कोणताही बोध घेत नाही, ज्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो.”
प्रमुख मागण्या:
१) नोंदणी अर्जातील ‘BSc’ पर्यायाची तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करावी
२) हेल्पलाईन यंत्रणा कार्यान्वित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे
३) तांत्रिक घोळामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असल्याने नोंदणी प्रक्रियेला योग्य मुदतवाढ मिळावी
ही समस्या तातडीने सुटली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.






