औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संतोषी माता नगर येथे प्रचार सभा उत्साहात संपन्न झाली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

‘प्रबुद्ध भारत’ आणि निवडणुकीसाठी आर्थिक मदत
या सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभागातून मिळालेली आर्थिक मदत.
जोगदंड परिवाराच्या वतीने ‘प्रबुद्ध भारत’ या वृत्तपत्रासाठी देणगी देण्यात आली. तसेच, प्रभाग क्रमांक २४ च्या प्रचार निधीसाठी आणि प्रभाग क्रमांक ३ मधील वंचितच्या अधिकृत उमेदवार करुणा मेघानंद जाधव यांच्या प्रचारासाठी देखील आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

सभेला संबोधित करताना अंजलीताई आंबेडकर यांनी स्थानिक समस्यांवर भर दिला. त्या म्हणाल्या की, “गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची गरज आहे. वंचित बहुजन आघाडी हाच सामान्य जनतेचा आवाज असून, उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.”

यावेळी व्यासपीठावर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाठ, प्रभाग २४ चे उमेदवार सतीश गायकवाड, अनुजा जगताप, सुनीता चव्हाण, रवि चव्हाण, तसेच प्रभाग ३ च्या उमेदवार करुणा मेघानंद जाधव आणि शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.






