औरंगाबाद : महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६ चे बिगुल वाजताच औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रचार दौऱ्याने शहरात प्रचाराचा धुरळा उडवला असून, त्यांच्या सभांना जनसागराचा महापूर लोटला आहे. “ज्यांनी शहराची तिजोरी लुटली, त्यांना सत्तेबाहेर फेकण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.
‘एमआयएम’ आणि ‘भाजप’च्या युतीवर टीका :
सुजात आंबेडकर यांनी एमआयएमवर (AIMIM) टीका केली आहे. ते म्हणाले, एमआयएममध्ये तिकीट देण्यासाठी ‘रेट’ ठरलेले आहेत. पैसे देऊन निवडून आलेला नगरसेवक जनतेची सेवा करण्याऐवजी स्वतःचे पैसे वसूल करतो. तसेच एमआयएम केवळ भाजपची भीती दाखवून मते घेते, पण सत्तेसाठी त्यांच्याशीच हातमिळवणी करते.
पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात :
“एमआयएमचे चिन्ह पतंग असले, तरी त्या पतंगाची दोर देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. फडणवीस ज्या दिशेला पतंग उडवतात, तिकडेच इम्तियाज जलील वळतात,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
इम्तियाज जलील यांनी आंबेडकर नगरच्या महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा सुजात आंबेडकर यांनी तीव्र निषेध केला. “औरंगाबादमध्ये महिलांनी ५०० रुपयांत मते विकली, असे म्हणणाऱ्या जलील यांनी महिलांचा घोर अपमान केला आहे. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि स्वाभिमानी सत्ता स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा,” असे आवाहन त्यांनी केले.
भीमनगर, भावसिंगपुरा आणि शहरातील विविध भागांत झालेल्या सभांमध्ये सुजात आंबेडकर यांनी स्थानिक प्रश्नांना हात घातला. ते म्हणाले, “लोकांना वाटते आमदार-खासदार मोठे असतात, पण प्रत्यक्षात आपल्या गल्लीतील पाण्याचे प्रश्न, वीज, रस्ते, महापालिकेची शाळा आणि हॉस्पिटल हे नगरसेवक ठरवत असतो. त्यामुळे आपला हक्काचा नगरसेवक निवडून देणे महत्त्वाचे आहे.”
तिकीट वाटपावरून इतर पक्षांत सुरू असलेल्या गोंधळावरही त्यांनी भाष्य केले. “इतर पक्षांत तिकीट कापल्यामुळे गाड्या फोडल्या जात आहेत, मारामारी सुरू आहे, अगदी गळफास घेण्यापर्यंत कार्यकर्ते जात आहेत.
मात्र, वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे, जिथे कसलेही भांडण नाही. कारण हा तळागाळातील आणि प्रामाणिक संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,” असे सुजात आंबेडकर यांनी ठामपणे सांगितले.
वंचितचे वारे सर्वत्र :
शहरातील गल्लीबोळांपासून ते तलाव काठावरील वस्त्यांपर्यंत सध्या वंचित बहुजन आघाडीचे वारे वाहत असल्याचे चित्र आहे. तरुणाईचा मोठा सहभाग आणि जनसामान्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी यंदा मोठी सत्तांतर घडवणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या सभेला पक्षाचे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, ॲड. रामेश्वर तायडे, राहुल मुगदल, सांडू श्रीखंडे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते,.






