संजीव चांदोरकर
याकडे सुटी घटना म्हणून नव्हे तर अमेरिकेचा साम्राज्यवाद, अमेरिकन तेल कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध, भू राजनैतिक, विशेषतः चीनबरोबर शह-काटशह आणि खुद्द अमेरिकतील ट्रम्प संबंधित अंतर्गत राजकारण असे सारे एकत्रितपणे बघावयास हवे.
ही कृती करतांना अमेरिकेने व्हिनेझुएला आणि मादुरो यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. हे अर्थात दाखवायचे दात आहेत. त्यांच्या खरेखोटेपणाबद्दल ही पोस्ट नाही. पण कोणत्याही सार्वभौम देशाबरोबर कितीही टोकाचे मतभेद असले तरी देश अशा पद्धतीने ताब्यात घेणे, त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला पकडून आपल्या देशात तुरुंगात टाकणे याचा निषेध करावा तितका कमीच आहे.
गेले दोन दिवस त्याच्या सविस्तर बातम्या मीडियावर येतच आहेत. त्याची पुनरुक्ती करत नाही. पण काही निरीक्षणे नोंदवावीशी वाटतात. यात अर्थातच अजून भर घालता येईल
१. अमेरिकेची ही कृती तिच्या गेल्या काही दशकांच्या साम्राज्यवादी इतिहासाची पुढची आवृत्ती आहे. कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा, नॉर्म पाळायचा नाही हाच नॉर्म आहे. ट्रम्प यांची नाट्यपूर्ण स्टाईल दुय्यम आहे.
२. जग मल्टीपोलर होत आहे. अमेरिकेने घातलेल्या पायंड्याचा वापर करत एकेका भूभागातील दादा राष्ट्रे, नजीकच्या भविष्यकाळात, आपल्या प्रभावक्षेत्रात इतर राष्ट्रांबरोबर अशाच व्यवहार करू शकतात.
३. गेली अनेक वर्षे अमेरिकेचा संरक्षण साहित्य, संशोधन आणि निर्मितीवर, केला जाणारा खर्च अफाट राहिला आहे. जगात एकूण होणाऱ्या संरक्षण खर्चातील एक तृतीयांश खर्च एकटी अमेरिका करते. वर्षानुवर्षे. संरक्षण खर्च करणारी पुढची दहा राष्ट्रे घेतली. तर अमेरिकेचा संरक्षण खर्च त्या दहा राष्ट्रांच्या एकत्रित खर्चापेक्षा जास्त आहे. या एका गोष्टीवरून अमेरिकेची संहारक ताकद आणि त्यातून आलेला माज लक्षात येईल.
४. व्हिनेझुएला जगातील सर्वात मोठे तेल साठे असणारा देश आहे. व्हिनेझुएलामधील समाजवादी चावेझपासून अनेक सरकारांनी तेल उत्खननांत फक्त सार्वजनिक मालकी ठेवली आहे. अमेरिकेतील महाकाय तेल कंपन्यांना ही धोरणे गेली अनेक दशके खटकत आले आहे. अमेरिकेला मादुरो यांच्या जागी अमेरिका धार्जिणा राष्ट्राध्यक्ष आणायचा आहे. जो गेल्या अनेक दशकांची तेल धोरणे बदलून अमेरिकन तेल कंपन्यांना दरवाजे उघडेल हा गेम प्लॅन आहे.
५. डोनाल्ड ट्रम्प यांना दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदी बसवणाऱ्या “मागा” आंदोलनाला भरघोस वित्तीय सहाय्य देणाऱ्यामध्ये अमेरिकेतील तेल कंपन्या आघाडीवर राहिल्या आहेत. खास उल्लेख करायचा तो ऑइल बॅरोन असणाऱ्या चार्ल्स आणि डेव्हिड या कोच भावांचा. ते ट्रम्प यांच्या खास मर्जीतील आहेत. येथे ट्रम्प यांनी क्लायमेट चेंज आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांची उडवलेली खिल्ली देखील लक्षात ठेवली पाहिजे.
६. ऐंशीच्या दशकापासून लॅटिन अमेरिकेतील अनेक देशात डावीकडे झुकलेल्या राजकीय पक्ष /संघटना/ आंदोलने मुळे पकडून आहेत. त्यातील अनेक देशांत त्यांनी सत्ता देखील मिळवली होती आणि आहे देखील. व्हिनेझुएला त्यापैकी एक. व्हिनेझुएलावर लष्करी हल्ला करून आणि त्याच्या राष्ट्राध्यक्षांना पकडून अमेरिका लॅटिन अमेरिकेतील सर्वच देशांमधील जनकेंद्री राजकीय शक्तींना इशारा देत आहे.
७. लॅटिन अमेरिकेतील देशांबरोबर चीनने आर्थिक आणि राजकीय सबंध प्रस्थापित केले आहेत. अनेक देशांत भांडवल गुंतवणुकी केल्या आहेत. चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पात लॅटिन अमेरिकेतील २४ देशांना सामावून घेण्यात आले आहे. आपल्या बॅकयार्ड पासून चीनने दूर रहावे असा चीनला इशारा देण्याचा हेतू दिसत आहे.
८. खुद्द व्हेनेझुएलाकडून चीन मोठ्याप्रमाणावर तेल विकत घेतो. ते देखील युआन मध्ये. अमेरिकेची ताकद येते जागतिक व्यापार आणि मुख्यत्वे तेल व्यापार डॉलर मध्येच होण्यातून. व्हेनेझुएलाचा तेल व्यापार डॉलर मध्येच झाला पाहिजे हे बघण्याची ही रणनीती आहे.
९ एपस्टीन फाईल्स सार्वजनिक झाल्यानंतर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षात ट्रम्प यांच्याविरुद्ध असंतोष वाढत आहे. ते प्रकरण झाकोळून जावे हा हेतू आणि या वर्षातील अमेरिकेतील निवडणुका देखील व्हिनेझुएला वरील हल्ला करण्यामागे डोळ्यासमोर आहेत.
१०. इराकवर हल्ला करून सद्दाम हुसेनची राजवट उलथून टाकणाऱ्या अमेरिकेचे सामर्थ्य पूर्वीसारखे राहिलेले नाही. ना जग एक खांबी राहिलेले आहे.
व्हेनेझुएला प्रकरण शायद लंबा खिचेगा.






