लातूर : लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आपला जोर लावला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्रात प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे.

प्रभाग क्र. १३ ‘अ’ चे अधिकृत उमेदवार अमोलभाऊ लांडगे यांच्या प्रचारार्थ नालंदा बौद्ध विहार येथे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची जाहीर सभा उत्साहात पार पडली. यावेळी सुजात आंबेडकरांनी महाविकास आघाडी आणि विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी सभेत मोठ्या संख्येने नागरिकांचं उपस्थिती होती. युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी सावध राहावे: सुजात आंबेडकर
सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, “निवडणुकीच्या काळात अनेकजण भूलथापा देऊन मते मागण्यासाठी येतील. मात्र, फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांच्या मतदारांनी आता सावध राहण्याची गरज आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, आपल्या हक्कासाठी आणि शहराच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.”

या सभेला लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी संतोष सूर्यवंशी (मराठवाडा महासचिव, वबआ), मंजुषा निंबाळकर (जिल्हा महिला अध्यक्षा), वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभागात परिवर्तनाचे वारे
प्रभाग १३ ‘अ’ मध्ये अमोलभाऊ लांडगे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या या सभेला स्थानिक नागरिकांचा भरभरून प्रतिसाद दिला. प्रस्थापितांना धक्का देत यावेळेस वंचित बहुजन आघाडी मुसंडी मारणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.






