नागपूर : वंचित बहुजन जिल्हा महिला आघाडीतर्फे २५ डिसेंबर रोजी दवलामेटी, नागपूर येथे ‘भारतीय स्त्री मुक्ती दिनाचा’ विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे घेतलेल्या पहिल्या महिला परिषदेच्या स्मृतींना उजाळा देत, दलित-बहुजन स्त्रियांच्या सामाजिक व धार्मिक लढ्यावर याप्रसंगी प्रकाश टाकण्यात आला.

स्त्री मुक्तीचा ऐतिहासिक वारसाकार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी महाड येथे घेतलेली महार स्त्रियांची परिषद हा केवळ योगायोग नव्हता, तर तो स्त्री मुक्तीच्या लढ्याची पायाभरणी होती. मनुस्मृती दहनापूर्वी ही परिषद घेऊन बाबासाहेबांनी सामाजिक लढ्यासोबतच स्त्रियांच्या अधिकारांचा लढा उभा करणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले होते.

आज गुजरात, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये जो स्त्री मुक्तीचा जागर दिसतो, ते भारिप बहुजन महासंघाने सुरू केलेल्या चळवळीचे यश असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
तळागाळातील महिलांच्या विकासाचा ठराव या परिषदेत मांडण्यात आलेल्या ठरावांचा मुख्य उद्देश तळागाळातील शेवटच्या महिलेचा विकास हाच होता. दलित आणि बहुजन स्त्रियांचा देशातील घडामोडींकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांसमोर मांडणे, हाच या चळवळीचा मुख्य अजेंडा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड. सुजाता वाल्देकर यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष विश्रांती रामटेके, माजी शहराध्यक्ष वनमाला उके, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी महानंदा राऊत, जिल्हाध्यक्ष अजय सहारे, आणि जिल्हा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर मंचावर उपस्थित होते.






