पनवेल : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपली कंबर कसली आहे. पक्षाच्या वतीने नुकताच उमेदवार निवड प्रक्रियेचा कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये पहिल्याच दिवशी तब्बल ३२ इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत पक्षाकडे आपले अर्ज सादर केले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड यांच्या सूचनेनुसार आणि पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रक्रियेमुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात वंचित बहुजन आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आणि इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड म्हणाले की, “ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून सर्वसामान्य आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी आहे. पक्षाच्या ध्येय-धोरणांचा प्रचार करून प्रत्येक शिलेदाराने विजयाचा निर्धार करावा.” आगामी निवडणुकीत कोणत्या रणनीतीने उतरले पाहिजे, याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

या निवड प्रक्रियेच्या वेळी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्यासहसरचिटणीस संतोष मुजमुले, सरचिटणीस अविनाश अडागळे, उपाध्यक्ष अमिना शेख, उपाध्यक्ष डॉ. छाया शिरसाट, उपाध्यक्ष कविता वाघमारे, उपाध्यक्ष सतिष अहिरे, प्रवक्ते कुमार मेटांगे, प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण, तालुका सरचिटणीस अक्षय उबाळेयाशिवाय पनवेल महानगर विभागीय अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. ३२ उमेदवारांनी एकाच दिवशी दाखवलेला उत्साह पाहता, पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.






