डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत सहाय्यता व सल्ला केंद्राचे उद्घाटन
मुंबई : युनेस्कोने 10 डिसेंबर 1948 रोजी जाहीर केलेले जागतिक मानवाधिकार घोषणापत्र प्रत्येक व्यक्तीस समानता, स्वतंत्रता, यातनांपासून सुरक्षा तसेच सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अधिकार प्रदान करते. हे अधिकार कोणत्याही सरकारचे देणे नसून प्रत्येक मानवाचे जन्मजात अधिकार आहेत. हेच विचार भगवान बुद्धांच्या करुणा, समता व न्यायाधिष्ठित तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहेत आणि भारतीय संविधानातही न्याय, स्वतंत्रता, समता व बंधुता या मूल्यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना धर्म, जात, लिंग, जन्मस्थान आदींच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत.
आज या विचारसरणीला व संविधानात्मक मूल्यांना विरोध करणारे काही लोक सत्तेत येत असल्याचे दिसते. त्यामुळे संविधान-समर्थकांनी एकत्र येत संविधान-विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे विश्वस्त/राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दल चे स्टाफ ऑफिसर ॲड. एस. के. भंडारे यांनी केले.
ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, झोन-4 जिल्हा शाखा यांच्या वतीने आयोजित बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत सहाय्यता व सल्ला केंद्र (परिवर्तनशील संस्था, दामू नगर, कांदिवली पूर्व) च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
ॲड. भंडारे व अंजली साळवे यांच्या हस्ते बीएसआय मिशन 25 अंतर्गत प्रथम सहाय्यता केंद्र व नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.
यानंतर ॲड. भंडारे म्हणाले, “या केंद्रामार्फत डॉक्टर, वकील, अभियंते, सरकारी व बँक अधिकारी यांचा समन्वय साधून गोर-गरीब संविधान-समर्थक नागरिक—एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला, पुरुष, युवक व युवती—यांना मोफत सेवा देण्याचे कार्य भारतीय बौद्ध महासभा करणार आहे.
जिल्हा शाखेनेही या उद्दिष्टपूर्तीसाठी तत्परतेने कामाला लागावे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या सासू श्रीमती प्रेमा पांडुरंग साळवे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी मुंबई प्रदेश सरचिटणीस दयानंद बडेकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद पगारे, तसेच उल्हासनगरच्या माजी नगरसेविका अंजली साळवे यांनी शुभेच्छा दिल्या. डॉ. अभिजित साळवे व डॉ. रिमा साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस व परिवर्तनशील संस्थेचे सचिव पंजाबराव गवई यांनी केले.






