अमरावती : तिवसा तालुक्यातील सातरगाव व वरखेड फिडरवरील गावांमध्ये दिवसाच्या वेळी नियमित कृषीपंप वीजपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने महावितरण कार्यालयावर तीव्र निषेध नोंदविला. सध्याच्या थंडीच्या उग्र परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी ओलीत करणे अत्यंत धोकादायक ठरत असून, अशा वेळी कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित महावितरण उपअभियंत्यावर एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी दिला.

महावितरणच्या विद्यमान वेळापत्रकानुसार कृषीपंपांना आठवड्यात ४ दिवस दिवसा व ३ दिवस रात्री वीजपुरवठा दिला जातो. मात्र सध्या कडाक्याच्या थंडीमुळे रात्रीच्या वेळी शेतात काम करणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. रात्रीचे ओलीत करताना जंगली प्राणी, सरपटणारे प्राणी तसेच थंडीचा तीव्र प्रकोप यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होत आहे. सिंचनाची आवश्यकता लक्षात घेता शेतकरी विवशपणे रात्रीच्या वेळी शेतात जात असल्याने त्यांची सुरक्षा धोक्यात येते, अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कामातील विलंबाबाबत वंचित बहुजन आघाडीची तीव्र नाराजी
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन कृषीपंपांचा वीजपुरवठा पूर्णपणे दिवसाच्या वेळीच ठेवावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.
या आंदोलनात युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते, तालुका अध्यक्ष मनीष खरे, जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, युवा तालुका अध्यक्ष सचिन जोगे, तालुका महासचिव अनिल सोनोने, मुस्ताक शाह, युवा ता. महासचिव अमोल जवंजाळ, ता. उपाध्यक्ष राजकुमार असोडे, सचिव सागर गोपाळे, सदस्य नितीन थोरात, प्रवीण निकाळजे, प्रदीप गांधी आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.





