अकोला : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागास निवेदन देण्यात आले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढविण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष धिरज इंगळे यांनी सांगितले की, स्वाधार योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, राज्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी अद्याप अर्ज करू शकलेले नाहीत. अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना खालील प्रमुख कारणांमुळे अडचणी येत आहेत:
1. महाविद्यालयांतून आवश्यक कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होत नाही
2. जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि अन्य शासकीय कागदपत्रे मिळण्यात विलंब
3. ऑनलाइन पोर्टलवर तांत्रिक समस्या
4. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधा नसणे
5. काही विद्यार्थ्यांना योजनेची माहिती उशिरा मिळाल्याने अर्ज प्रक्रियेत अडथळे
या सर्व कारणांमुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही, हे मोठे अन्यायकारक असल्याचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाने म्हटले आहे.
धिरज इंगळे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी स्वाधार योजनेची अंतिम तारीख किमान 30 दिवसांनी वाढवावी. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.”
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने शासनाने यावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाउपाध्यक्ष अनिकेत सिरसाठ, प्रसिद्धि प्रमुख अंकित इंगळे, सोशल मीडिया प्रमुख अंकुश धुरंधर, सोमेश दाभाड़े, भूषण शिरसाठ, सूजीत डोंगरे, स्वराज तायडे, कनिष्क सोनोने आदि विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.






