नागपूर : नागपूर जिल्ह्यात पोलिस शिपायाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस शिपायाला मारहाण करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून भाजप पदाचे उमेदवार अनिल शर्मा हे आहेत. मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शिपायाला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिक संतापले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल शर्मा हे भाजप पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. ते नागपूर जिल्यातील हिंगणा तालुक्यांतर्गत डिगडोह नगरपरिषद परिसरात भाजपचे नगरसेवक आहेत. अनिल शर्मा आणि त्याच्यासह १० ते १२ कार्यकर्त्यांनी मिळून पोलिस शिपायाला मारहाण केली आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटने नंतर परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, डीजेच्या आवाजाने हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिस शिपाईचे वृषभभातुलकर असे नाव आहे. ते हिंगणा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. ड्युटीवरून घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. परतताना त्यांच्या सोसायटीत भाजप कार्यकर्त्यांच्या घरी मोठ्या आवाजात डिजे सुरू असल्याचे आढळले.
यापूर्वी, शिपाई भातुलकर यांच्या मुलीच्या वाढदिवसावेळी सोसायटीचे सचिव अभयकुमार दास यांना त्यांना आवाज बंद करण्यासाठी दबाव आणला होता. मात्र भाजप कार्यकर्त्याच्या घरी डिजेचा आवाज सुरु असल्याने त्यांनी सोसायटीचे सचिव अभयकुमार दास यांना विचारणा केली होती.
मात्र सचिव दास यांनी उलट भातुलकर यांच्यावरच दादागिरी केली.
सचिव अभय दास यांनी भाजप उमेदवार अनिल शर्मा यांना खाली बोलावले. भातुलकर खाली येताच अनिल शर्मा यांनी त्यांना कॉलर पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अभयकुमार दास, शरद शर्मा, साजन शर्मा, अजय पाठक यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्ते उपस्थित होते. वृषभ भातुलकर यांना घेरून ही सामूहिक मारहाण करण्यात आले.
मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
या मारहाणीदरम्यान आरोपींनी शिपाई भातुलकर यांना “तुझी खाकी वर्दी उतरवून टाकीन”, “सस्पेंड करून टाकीन” आणि “जीव मारून टाकीन” अशा गंभीर धमक्या दिल्याचा आरोप भातुलकर यांनी केला आहे. या गंभीर घटनेनंतर हिंगणा पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याऐवजी, दोन्हीकडील तक्रारी घेऊन केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांनी आरोपींवर अटकेची किंवा कठोर कलमांची कारवाई न केल्यामुळे पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. राजकीय दबावाखाली काम करत असल्याची टीका होत आहे.
या धक्कादायक घटनेनंतर नागपूर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून निष्पक्ष आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





