पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात 25 नोव्हेंबर रोजी घडलेल्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडी (पश्चिम) तर्फे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या कार्यालयासमोर ‘पाल भेट आंदोलन’ करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये मिळालेल्या जेवणात शिजलेली पाल आढळून आली आणि ते जेवण विद्यार्थ्यांना वाढण्यात आल्याने तब्बल 28 विद्यार्थ्यांना प्रकृती बिघडून रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकाराने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.या आधीही मेसच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी करण्यात आले होते.
तसेच आंदोलन देखील केले गेले होते. मात्र, तक्रारी, आंदोलने करून देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन युवा आघाडीने आज मंत्री शिरसाठ यांना पाल भेट देत निषेध नोंदवला.

“वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने लक्ष दिले नाही, त्यांच्या दुर्लक्षामुळेच आज हा जीवघेणा प्रकार झाला,” असे वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम अध्यक्ष राहुल मकासरे यांनी आंदोलनस्थळी वक्तव्य केले.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या :
– मेस चालकाचा ठेका तात्काळ रद्द करावा.
– विषबाधा घडवून आणल्याचा गुन्हा दाखल करावा, वॉर्डनचे निलंबन करावे.
– मेस चालकाकडून खंडणी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करावा.
या मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.या आंदोलनात पश्चिम अध्यक्ष राहुल मकासरे, उपाध्यक्ष निलेश बनकर, अरुण मते यांसह शेकडो विद्यार्थी मोठ्या उपस्थितीत सहभागी झाले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






