मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सोनेरी अध्याय आज समाप्त झाला. आपल्या दमदार अभिनयाने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास निधन झाले. गेले अनेक दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर, आज त्यांची प्राणज्योत मालवली.
सिनेसृष्टीतील या महान कलाकाराच्या पार्थिवावर दुपारी विलेपार्ले येथील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण बॉलिवूड शोकाकुल झाले.
दुपारी १२.३० च्या सुमारास त्यांचे पार्थिव स्मशानभूमीवर आणले गेले. धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते. देओल कुटुंबीयांसह अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आमिर खान यांसारख्या कलाकारांनी स्मशानभूमीवर हजेरी लावली.
‘बॉलिवूडचा ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचा सिनेसृष्टीतील प्रवास सहा दशकांहून अधिक काळचा आहे. १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून सुरू झालेला हा प्रवास लाखो चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय गाथा ठरला.
‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या.
चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने २०१२ साली त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले होते. येत्या २५ डिसेंबर रोजी त्यांचा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.






