जामनेर : नगरपरिषद निवडणुकीने आता चांगलेच राजकीय धुमशान घातले आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी, भाजप पक्षावर साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करत उमेदवारांवर दबाव टाकल्याचे आणि दादागिरी केल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. भाजपने ९ जागांवर बिनविरोध विजय मिळवल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘दादागिरी’चा व्हिडिओ व्हायरल
आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र, या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांकडून दादागिरी केली जात असल्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे भाजपवर गंभीर टीका होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना जबरदस्तीने अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले. इतकेच नाही, तर अर्ज माघारी घेण्याची अधिकृत वेळ दुपारी ३ वाजता संपल्यानंतरही काही अर्ज मागे घेण्याचे प्रयत्न झाले. याला काही उमेदवारांनी तीव्र विरोध केल्यामुळे ३ वाजतानंतरचे अर्ज माघारी घेता आले नाहीत.
अर्ज माघारीच्या या गोंधळात आणि आरोपांच्या पार्श्वभूमीवर, भाजपने ९ जागांवर बिनविरोध निवड साधल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर नगरपरिषदेतील एकूण ९ जागांवरील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे हे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
भाजपने बिनविरोध निवडणुकीसाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा दुरुपयोग केल्याचा आणि विरोधकांवर दबाव टाकून माघार घेतल्याचा गंभीर आरोप होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ‘दादागिरी’च्या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अर्ज माघारीच्या दिवसाचे हे नाट्य आणि बिनविरोध निवडणुकीमुळे जामनेरच्या राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले आहे.





