अकोला : राज्यभरात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना, अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने ओबीसी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात घोंगडी बैठकींचा दौरा सुरू केला आहे.
अकोला तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या यशस्वी बैठकीनंतर बाळापूर तालुक्यातही सुमित नवलकर यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका पार पडत आहेत.
बाळापूर तालुक्यातील निंबा, अंदुरा, मानरखेड, कसूरा, कोलासा, चिंचोली आणि तामशी या गावांमध्ये झालेल्या घोंगडी बैठकींना स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. ओबीसी आरक्षण, हक्क, संविधानिक प्रश्न आणि राजकीय प्रतिनिधित्व या मुद्द्यांवर या बैठकीत सखोल चर्चा झाली.
वंचित बहुजन आघाडीने ओबीसी समाजातील प्रश्न गावपातळीवर समजून घेण्यासाठी आणि जनआंदोलन मजबूत करण्यासाठी हा दौरा सुरू केला असून, आगामी दिवसांत बाळापूर तालुक्यातील इतर गावांमध्येही बैठकींचा क्रम सुरूच राहणार असल्याचे संकेत आहेत.
या बैठकींमुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढताना दिसत असून, स्थानिक पातळीवरून मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा आगामी आंदोलनासाठी बळकटी देणारा ठरत आहे.






