बीड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ताकदीने लढून सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान बीडमध्ये त्यांची भव्य जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना ‘वंचित’च्या उमेदवारांना मतदान करून स्वतः सत्तेत बसण्याचे आवाहन केले. यावेळी वेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात बीडमधील नागरिकांचे मूलभूत प्रश्न प्रस्थापितांनी अजूनही सोडवले नसल्याचे नमूद केले. “आपल्या हक्काचे नगरसेवक निवडून आणून आपला विकास आपणच करायचा आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

“ओबीसी आरक्षण, वंचित-शोषितांवर होणारे अन्याय, एससी आरक्षणावर हल्ले, बौद्धांच्या हक्क-अधिकारांवर होणारे हल्ले अशावेळी लढायला फक्त वंचित बहुजन आघाडीच उभी राहते,” असे ठाम प्रतिपादन सुजात आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीने बीड नगराध्यक्ष पदासाठी सारिका जोगदंड यांना, तर नगरसेवक पदासाठी किरण संदीप जाधव आणि प्रियांका काळे यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले.

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्त प्रशांत बोराडे, बीड पश्चिम जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीने बीडमध्ये संपूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून, या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.





