नवी मुंबई : श्रमिकनगर, ऐरोली परिसरातील झोपडपट्टी हटविण्यासंदर्भात कोर्टाकडून आलेल्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा कमिटी तसेच ऐरोली तालुका कमिटीची स्थानिक नागरिकांसोबत विशेष बैठक पार पडली.
चिंतेच्या वातावरणात झालेल्या या बैठकीत नागरिकांना धीर देत त्यांच्या हक्कांसाठी सर्वतोपरी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कोर्टाने जारी केलेल्या नोटिसींची सविस्तर माहिती, पुढील प्रक्रिया आणि नागरिकांच्या बाजूने उभे राहण्याची जबाबदारी यावर उपस्थित मान्यवरांनी चर्चा केली.
जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती आजच ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना देण्यात आली असून, वंचित बहुजन आघाडी कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी पूर्णपणे तत्पर आहे. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, येणाऱ्या काळात श्रमिकनगर येथील घरं वाचविण्यासाठी रस्त्यावरचा लढा असो किंवा कोर्टाची लढाई असो वंचित बहुजन आघाडी ठामपणे झोपडपट्टीवासीयांसोबत उभी राहील.
बैठकीस जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, ऐरोली तालुकाध्यक्ष राजेश भालेराव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप वाघमारे, ऍड. अजय गायकवाड, तसेच आकाश भारदे, प्रतीक शिंदे, पल्लवी शिंदे, संभाजी वाघमारे, अक्षय दावणे, गौतम सपकाळे, विकास सोनावणे यांसह श्रमिकनगर येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. झोपडपट्टीवासीयांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सुरू झालेली ही लढाई पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.






