उरणच्या इतिहासातील नवी पहाट; नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण
रायगड : उरण ते मुंबई तसेच उरण ते नवीमुंबई अशी बेस्टची बस सेवा अखेर सुरू झाली. वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही सेवा उपलब्ध झाल्याने उरणकरांनी समाधान व्यक्त केले आहे.उरण तालुका सध्या दळणवळणाच्या दृष्टीने वेगाने विकसित होत आहे. रेल्वेसेवा सुरू झाल्यापासून कनेक्टिव्हिटी वाढली असून लवकरच सुरू होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. त्यातच आता बेस्ट बससेवा सुरू झाल्याने नागरिकांच्या सोयींत मोठी भर पडली आहे.
उरण ते मुंबई (कुलाबा), उरण ते बांद्रा स्टेशन (पूर्व) आणि उरण ते वाशी या मार्गांसाठी अनेक वर्षांपासून नागरिक मागणी करीत होते. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी बेस्ट प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.
१४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता द्रोणागिरी सेक्टर १२ येथील भूपाळी गृहसंकुलातून पहिल्या दोन बसांचे लोकार्पण करण्यात आले. मुंबई आणि नवी मुंबईकडे रवाना झालेल्या या बससेवेला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी तुषार उत्तम गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष नामदेव कुरणे, भूपाळी सोसायटीचे अध्यक्ष दिनेश पवार, भैरवी सोसायटीचे अध्यक्ष नवनाथ डोके, सेक्रेटरी लक्ष्मण मोटे, तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे तसेच भूपाळी, भैरवी, मल्हार सोसायटीचे नागरिक उपस्थित होते.
नव्या बससेवेच्या शुभारंभानंतर उरण ते मुंबई प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि स्वस्त होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. उरणच्या दळणवळण विकासातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.






