पुणे : पुण्यातील मुंढवा येथील दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुमारे ३०० महार कुटुंबांच्या महार वतनाची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप करत, ‘अभेडिया ३ एंटरप्रायजेस एलएलपी’ (Abhedia 3 Enterprises LLP) या कंपनीचे भागीदार दिग्वीजय अमर सिंह पाटील आणि मुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासह एका व्यक्तीविरोधात मुंढवा येथील एका तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
प्रकाश हिरामन ढाले (वय ५३, रा. मुंढवा, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मौजे मुंढवा, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्वे नं. ८८/१, ८८/२ सह मिळकत क्र. (सिटी सर्वे न. ११७८) ही समस्त महार समाजाची एकत्रित सामाईक हिस्स्याची वडीलोपार्जित मालकी हक्काची जमीन आहे. या जमिनीची महार वतनी असण्याची सनद सन १८०० पासून त्यांच्या नावे आहे.
बोगस खरेदीखताद्वारे फसवणूक –
तक्रारीनुसार, सदर महार वतनी मिळकतीचे कुलमुख्त्यारपत्र केवळ न्यायालयीन कामकाजाकरिता सन २००६ मध्ये मे. पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर्स तर्फे शीतल किशनचंद तेजवानी यांना काही मूळ वतनदारांनी दिले होते. परंतु, हे कुलमुख्त्यारपत्र बेकायदेशीर ठरवून ते रद्द करण्यासाठी दि. ५/२/२००८ रोजी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती.
या बेकायदेशीर कुलमुख्त्यारपत्राचा आधार घेत शीतल किशनचंद तेजवानी यांनी दि. २०/०५/२०२५ रोजी सहाय्यक दुय्यम निबंधक हवेली क्र. ४, बावधन येथे दस्त क्र. ९०१८/२०२५ अन्वये, शासनाची आणि मूळ मालकांची फसवणूक करून, ‘अभेडिया ३ एंटरप्रायजेस एलएलपी’ तर्फे भागीदार दिग्वीजय अमर सिंह पाटील यांच्या नावाने बोगस आणि बेकायदेशीर खरेदीखत तयार केले. या संपूर्ण व्यवहारात ‘अभेडिया ३ एंटरप्रायजेस एलएलपी’चे दुसरे भागीदार पार्थ अजीत पवार हे देखील सहभागी असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
‘BNS’ आणि ‘अॅट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी –
वरील तीनही आरोपींनी संगनमत करून समस्त महार समाजाची फसवणूक केली आहे, त्यांची वतनाची जमीन हडप केली आहे आणि बेकायदेशीर व खोटे दस्तऐवज तयार करून जमीन बळकावली आहे, अशी माहिती आपल्याला नुकतीच दि. ७/११/२०२५ रोजी मिळाली, असे तक्रारदार प्रकाश ढाले यांनी नमूद केले आहे.
या गंभीर फसवणुकीबद्दल, तक्रारदारांनी शीतल किशनचंद तेजवानी, दिग्वीजय अमर सिंह पाटील आणि पार्थ अजीत पवार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (फसवणूक/Cheating), ३३७, ३३९, ३४० (बनावट दस्तऐवज आणि मालमत्तेशी संबंधित गुन्हे), ३(५) (BNS मधील कलम ३(५) गैर-कायदेशीर कृतीशी संबंधित आहे) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ (अॅट्रॉसिटी अॅक्ट) चे कलम ३(१)(f) (जमिनीचा गैरप्रकारे उपभोग घेणे) आणि ३(१)(g) (बेकायदेशीरपणे मालमत्ता बळकावणे) अन्वये तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
मूळ वतनदार कालीदास केरू गायकवाड, संकेत विकास गायकवाड, संदीप सुरेश गायकवाड, अजीत हनुमंत गायकवाड, सतीश चिंतामन गायकवाड, रोहन रमाकांत जाधव आणि इतरांनाही या फसवणुकीची माहिती मिळाली असून त्यांनी या तक्रारीचे समर्थन केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ऍड अरविंद तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात पुण्यात आंदोलन केले असून फसवणूक करणाऱ्या लोकांविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.






