सवलतीच्या दरात पुस्तक विक्री काव्यसंमेलन व व्याख्यान
पुणे : ७ नोव्हेंबर १९०० हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस. हा दिवस शासनाने ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले असून या निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने साताऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी ७ नोव्हेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस विद्यार्थी दिन म्हणूनही साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
या वर्षी डॉ. बाबासाहेब यांच्या नावाने स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बार्टीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे व बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे व विस्तार व सेवा विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये शिकले.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल जुना राजवाडा सातारा येथे शाळा प्रवेश दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. सकाळी आठ वाजता महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांची ‘समता रॅली’ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ही रॅली प्रतापसिंह भोसले या शाळेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाईल. त्यानंतर दुपारी १.०० वाजता पत्रकार अरुण जावळे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनासंदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
व्याख्यान झाल्यानंतर दुपारी दोन वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या कवयित्री रमणी प्रजेंट्स निमंत्रित कवींचे एक वैचारिक कवी संमेलन “कविता बाबासाहेबांच्या” आयोजन करण्यात आले आहे. आकाश आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडणार आहे.
त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने वाचकांना महापुरुषांच्या जीवनावरील ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सवलतीच्या दरात विक्री बुक स्टॉल लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने नागरिकांनी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे दिलीप वसावे जिल्हा प्रकल्प अधिकारी सातारा समतादूत राहुल गंगावणे विशाल कांबळे यांनी बार्टीच्या वतीने आवाहन केले आहे.






