८ दिवसात कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा
हिंगोली : कळमनुरी शहरातील सेठ नारायणदास सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नारायणा पब्लिक स्कूल येथे दि. 04 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या राजकीय आणि धार्मिक स्वरूपाच्या संघटनेमार्फत अल्पवयीन विद्यार्थ्यांना धार्मिक व जातीवादी प्रशिक्षण देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी, कळमनुरी तालुका यांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रारीचे निवेदन सादर करण्यात आले. तक्रारीत नमूद केले आहे की, दिनांक 28 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत वय वर्ष 13 ते 23 वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारे प्रशिक्षण देण्यात आले, तेही कोणतीही शासकीय अथवा शैक्षणिक परवानगी न घेता.
घटनास्थळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट देताच पोलिस प्रशासनालाही पाचारण करण्यात आले. यावेळी प्रशिक्षण सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य मागण्या:
१) संबंधित शाळेचा परवाना तात्काळ रद्द करावा.
२) महाराष्ट्र खाजगी शाळा नियमानुसार शाळांमध्ये फक्त शैक्षणिक उपक्रम राबविण्याची परवानगी आहे. धार्मिक किंवा संघटनात्मक प्रशिक्षण हा बेकायदेशीर प्रकार असल्याने जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा.
३) शिक्षण विभाग अथवा पोलिसांकडून या प्रशिक्षणास परवानगी देण्यात आली होती का, याची चौकशी करावी.
अल्पवयीन मुलांवर धार्मिक किंवा राजकीय विचारसरणी लादणे हे बालहक्क संरक्षण कायदा, शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE 2009), महाराष्ट्र शिक्षण अधिनियम आणि भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तरतुदींचे उल्लंघन आहे — त्यामुळे संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा नोंदवावा.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकतेच “कळमनुरी” या शहराचे नाव बदलून “कदंबनगरी” या नावाने मिरवणूक काढली असून, या उपक्रमामुळे हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट चेतावणी दिली आहे की, प्रशासनाने ८ दिवसांच्या आत ठोस कारवाई केली नाही, तर कळमनुरीत मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल.
या वेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे, जिल्हा महासचिव ज्योतिपाल रणवीर, कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे, जी.सहसचिव प्रवीण थोरात, युवा तालुका अध्यक्ष मोहम्मद अस्लम, ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत नरवाडे, शहराध्यक्ष शकील पठाण, युवा तालुका महासचिव संतोष इंगोले, युवा सचिव जयभीम डोंगरे, तसेच प्रशांत चोपडे, दादाराव खंदारे, समाधान पाईकराव आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रकरणी प्रशासनाने त्वरित चौकशी करून शाळेवरील व संघटनेवरील कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.






