वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी करण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली.
बैठकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांनी महानगरपालिकेने योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर अधिकारी यांना ठोकणार, घेतलेल्या या आक्रमक भूमिकेनंतर आयुक्त गगराणी यांनी स्पष्टपणे सांगितले की,“महानगरपालिका सर्व सुविधा पुरवते, मात्र जर संबंधित अधिकारी या सुविधांची अंमलबजावणी करण्यात कुचराई करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व नागरी सोयी-सुविधा योग्यप्रकारे मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश गगराणी यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर, मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी, कमलेश उबाळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.




