पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयोगाने वारंवार नोटीस पाठवूनही उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्यामुळे संतप्त झालेल्या आयोगाने आता त्यांना ‘कारण दाखवा’ नोटीस बजावली आहे. या नोटिसीद्वारे, त्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी का मान्य करू नये, असा थेट सवाल आयोगाने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने उद्धव ठाकरे यांना आतापर्यंत दोन वेळा नोटीस पाठवली आहे. मात्र, माजी मुख्यमंत्र्यांकडून या नोटिसेसकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. आयोगाने उद्धव ठाकरे यांना स्पष्टपणे इशारा दिला आहे की, जर ते २ डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत, तर कायद्याच्या चौकटीत पुढील कारवाई केली जाईल.




