मुंबई : पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी, कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव मिळावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त वेळकाढूपणा करत असून, शेतकऱ्यांचा बळी घेत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
यासंदर्भात ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “राज्य सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील आहे. शासनाला केवळ वेळ काढायचा आहे आणि शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तत्काळ मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, ही मागणी आम्ही वारंवार करत आहोत.”
सत्ताधारी आमदारांच्या घरांवर मोर्चे काढण्याचा इशारा –
वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीही प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात सत्ताधारी आमदारांच्या घरावर मोर्चे काढले होते. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रभरातील सर्वच सत्ताधारी आमदारांच्या घरावर मोर्चे काढायला भाग पाडू नका, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
दिवाळीपर्यंत मदत न मिळाल्यास ‘काळी दिवाळी’ –
निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून मते घेऊन हे सत्तेवर आले, याची आठवण करून देत ऍड. आंबेडकर म्हणाले की, “शेतकऱ्यांना जर दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई मिळाली नाही, तर सर्वच सत्ताधारी आमदारांच्या घरी जाऊन शेतकऱ्यांसोबत काळी दिवाळी साजरी करू.”
शासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई या ज्वलंत प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.