नाशिक : येवला येथील ऐतिहासिक मुक्तीभूमी येथे ‘प्रबुद्ध भारत’च्या बुक स्टॉलचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे एस. के. भंडारे, गौरव पवार, देवेंद्र उबाळे, संविधान गांगुर्डे, शिशुपाल गवई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने त्यांना सलामी देण्यात आली.
मुक्तीभूमी, येवला हे स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’ अशी धर्मांतराची घोषणा केली होती, त्या ऐतिहासिक परिषदेचे साक्षीदार आहे.