अकोला : वंचित बहुजन आघाडी मध्ये आज मूर्तिजापूर तालुक्यातील धनगर समाजातील युवा समितीचे तालुका अध्यक्ष आणि युवा सेनेच्या शिरसो सर्कल प्रमुख यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
मूर्तिजापूर तालुका येथील झालेल्या कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये धनगर समाजाचे युवा समिती तालुका अध्यक्ष, युवा सेनेचे शिरसो सर्कल प्रमुख, तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरेश शेंडोकर, चेतन तांबडे, गौरव सरदार, यश सरोद, संजू शेंडे आणि गौतम सौतकर यांचा प्रमुख सहभाग होता.
धनगर समाजातील युवा नेतृत्वाने वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यात पक्षाची ताकद वाढणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, वंचित आणि बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.