यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीचे नूतन जिल्हाध्यक्ष डी.के. दामोधर यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरखेड शहर आणि उमरखेड तालुका कार्यकारिणीचे गठन करण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
यावेळी शहर व तालुक्यातील विविध समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी स्वयंस्फूर्तीने वंचित बहुजन आघाडीचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. बहुजन नायक बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करून या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष डी.के. दामोधर यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज भरून मुलाखती दिल्या.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी सभेत विविध मान्यवरांनी आपली भूमिका मांडली. शेवटी जिल्हाध्यक्ष डी.के. दामोधर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ढाणकी नगरपंचायतीप्रमाणेच सर्व ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांनी आळस झटकून कामाला लागावे.
या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, जिल्हा सदस्य मंगल खराटे, माजी सभापती संबोधी गायकवाड, आनंद वाहुळे, भीमराव हापसे, सिद्धार्थ धोंगडे, राजेश घुगरे, शकील अहमद, गणेश वाठोरे, कैलास कांबळे, संभाजी बहादुरे, राहुल गवळे, अनाथपिंडक खडसे, अमोल कांबळे, शेख सलीम, सय्यद इरफान, संतोष गायकवाड, ऋषी कवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.