पिंपरी-चिंचवड : प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून रस्त्यावर आलेल्या पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बस आता प्रवाशांसाठीच धोकादायक ठरत आहेत की काय, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दुपारच्या सुमारास प्रवाशांनी भरलेल्या एका धावत्या इलेक्ट्रिक बसने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये पळापळ सुरू झाली होती.
‘आग’ लागून दरवाजे झाले लॉक; प्रवाशांची मोठी तारांबळ
आकुर्डीहून निगडीच्या दिशेने जात असताना अचानक ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बसला भीषण आग लागली. यावेळी या बसमध्ये अंदाजे ३५ ते ५० प्रवासी प्रवास करत होते. आगीमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. विशेष म्हणजे, आग लागल्यानंतर बसचे दरवाजे लॉक झाल्याने परिस्थिती आणखी बिघडली आणि प्रवासी प्रचंड भयभीत झाले. दरवाचे न उघडल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. चालकाने ऐनवेळी प्रसंगावधान राखले. त्याने तात्काळ दरवाजे उघडून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि एक मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेने पीएमपीएमएलच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हडपसर परिसरात कॉम्प्रेसर फुटल्याने बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडल्याने या ई-बसच्या तांत्रिक तपासणी आणि सुरक्षिततेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.