मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या अनोख्या निषेध आंदोलनाचा अखेर परिणाम दिसू लागला आहे. पाटी–पेन्सिल देऊन केलेल्या प्रतीकात्मक आंदोलनानंतर अखेर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाला जाग आली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, जागृती नगर (कुर्ला पूर्व) तसेच हनुमान नगर येथील लादीकरण आणि शौचालय दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
या भागातील नागरिकांनी अनेकदा या सुविधांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सर्जनशील पद्धतीने “पाटी-पेन्सिल देऊन प्रशासनाला शिक्षण द्या” या घोषवाक्याखाली निषेध व्यक्त केला होता.
या निषेधानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून मैदान, लादीकरण आणि सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीची कामे लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
स्थानिक नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी या निर्णयाचे स्वागत करत “आमच्या लढ्याला यश मिळाले” अशी भावना व्यक्त केली आहे.