पुणे : बार्टी (BARTI) कार्यालयात भारतीय संविधानाच्या प्रती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य/खंडाची विटंबना झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला असून, या प्रकरणात बार्टीचे महासंचालक सुनील वारे जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या संदर्भात वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सागर आल्हाट यांनी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचांसमवेत पंचनामा केला असून तपास सुरु आहे.
या घटनेवर तातडीने गुन्हा नोंदवून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी २ ऑक्टोबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने ॲडिशनल पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील यांची सेंट्रल बिल्डिंग, पुणे स्टेशन येथे भेट घेतली. पोलिसांनी दोन दिवसांची मुदत मागितली असल्याची माहिती मिळाली आहे.
यावेळी युवा राज्य सदस्य विशाल गवळी, पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, उपाध्यक्ष गौतम ललकारे, दिपक ओव्हाळ, रेल्वे युनियन अध्यक्ष पद्मश्री साळवे, ॲड. विवेक लोंढे, उमेश साळवी, प्रसिद्धी प्रमुख नवनीत अहिरे, स्वप्निल वाघमारे, नितीन कांबळे, परमेश्वर सनादे, पंचशील चौरे, किशोर रिकीबे, ओमकार कांबळे, अमर सावंत, अभिजित बनसोडे, विराज लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या विषयावर मंगळवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी आंदोलन होणार असून त्याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.