भारतीय वेटलिफ्टिंगची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीराबाई चानूने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. नॉर्वेमधील फोर्डे येथे सुरू असलेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये तिने १९९ किलो वजन उचलून रौप्य पदकाची कमाई केली.
तिसऱ्या विश्वस्तरीय पदकासह विक्रमी कामगिरी
हे यश मीराबाई चानूसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे तिच्या कारकिर्दीतील तिसरे जागतिक पदक आहे! या विक्रमी कामगिरीमुळे ती सर्वाधिक जागतिक पदके जिंकणाऱ्या भारतीय वेटलिफ्टरपैकी एक बनली आहे. याआधी तिने २०१७ मध्ये अमेरिकेतील अनाहाईम येथे ४८ किलो गटात सुवर्णपदक आणि २०२२ मध्ये बोगोटा येथे ४९ किलो गटात रौप्यपदक जिंकले होते.
यंदाच्या स्पर्धेत ४८ किलो गटात चानूची लढत अत्यंत चुरशीची झाली. स्नॅचमध्ये ८४ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११५ किलो असे एकूण १९९ किलो वजन उचलून तिने दुसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत उत्तर कोरियाच्या रि सांग गुम हिने २१३ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.
चीनच्या थान्याथनसोबत तिची खरी लढत झाली. स्नॅच फेरीत थान्याथन ४ किलोने पुढे होती, मात्र क्लीन अँड जर्कमध्ये मीराबाईने जबरदस्त कमबॅक करत तिला मागे टाकले. फक्त १ किलोच्या फरकाने तिने रौप्यपदक आपल्या नावावर केले आणि थान्याथनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
प्रशिक्षकांना यशाचं समर्पण
गेल्या काही वर्षांत दुखापतींमुळे मीराबाईच्या कारकिर्दीत मोठे अडथळे आले होते, पण तिच्या अदम्य जिद्दीने तिला पुन्हा जागतिक स्तरावर आणले. या ऐतिहासिक यशानंतर तिने थेट आपले प्रशिक्षक विजय शर्मा यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांचे आभार मानले.
अहमदाबादमधील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकून पुनरागमनाची नांदी देणाऱ्या चानूने आता विश्वस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकून भारतीय वेटलिफ्टिंगचा झेंडा मोठ्या अभिमानाने उंचावला आहे. तिचे हे यश लाखो खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे!