पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मोठा निर्णय घेतला आहे. २८ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजित असलेली महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा (राज्यसेवा पूर्व परीक्षा) आता पुढे ढकलण्यात आली आहे.
अखेर, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील पूरबाधित भागांतील उमेदवारांची मागणी मान्य करत आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
परीक्षेची सुधारित तारीख जाहीर
आयोगाने जाहीर केलेल्या शुद्धीपत्रकानुसार, ही परीक्षा आता २८ सप्टेंबरऐवजी ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येईल. सुरुवातीला परीक्षा पुढे ढकलण्यास नकार देणाऱ्या आयोगाने उमेदवारांचा वाढता विरोध आणि नैसर्गिक आपत्तीची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला.
राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी महामार्ग बंद आहेत, तर अनेक गावं आणि तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे अत्यंत कठीण झाले होते. आता परीक्षा पुढे गेल्यामुळे, विशेषतः अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांतील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
- २८ सप्टेंबर, २०२५ रोजी ३७ जिल्हाकेंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार होती.
- राज्यातील पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटल्याने, परीक्षा ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात येईल.
- ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी पूर्वनियोजित असलेली महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची सुधारित तारीख लवकरच स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल.
या निर्णयामुळे पूरग्रस्त भागातील उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी आता अतिरिक्त वेळ मिळणार आहे.