नवी दिल्ली : दिल्लीतील एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये १७ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी स्वयंघोषित धर्मगुरू स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी सध्या फरार आहे.
दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य असलेल्या स्वामी चैतन्यानंद याच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. ईडब्लूएस (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) शिष्यवृत्ती अंतर्गत पीजीडीएम कोर्स करणाऱ्या विद्यार्थिनींना तो व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवत होता, तसेच त्यांच्याशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप करण्यात आला आहे.
४ ऑगस्ट २०२५ रोजी श्री शृंगेरी मठाचे प्रशासक पी.ए. मुरली यांनी वसंत कुंज नॉर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणात एकूण ३२ विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले असून, त्यापैकी १७ जणींनी चैतन्यानंद याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आरोपीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काही महिला प्राध्यापकांनी विद्यार्थिनींवर दबाव टाकल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून स्वामी चैतन्यानंद फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी संस्थेतील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. तसेच, संस्थेच्या तळघरातून स्वामी चैतन्यानंद वापरत असलेली व्हॉल्वो कारही जप्त करण्यात आली आहे. या गाडीसाठी युनायटेड नेशन्सचा बनावट डिप्लोमॅटिक नंबर वापरल्याचेही तपासात उघड झाले आहे.