बीड : सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीने वडवणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके जमिनीमध्ये पूर्णपणे खराब झाली आहेत. कापणीला आलेल्या पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झाले असून, अनेक शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्याने त्यांच्यावर आत्महत्येचे संकट वाढत आहे.
या संकटाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसलेला नाही, तर शेतमजूर, व्यापारी आणि ग्रामीण उद्योगांवरही याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी वंचित बहुजन युवा आघाडीने सरकारकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
- राज्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी.
- शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी.
- शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.
या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. हे निवेदन सादर करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोद काकडे यांच्यासह प्रकाश उजगरे, पवन उजगरे, विकास डोंगरे, अमोल डोंगरे, सचिन हाताळले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.